Wednesday, June 3, 2026
Latest NewsPUNE

मॅरेथॉन स्पर्धेत धावले बांधकाम कामगार

पुण्यात प्रथमच बांधकाम कामगारांसाठी एका आगळ्या वेगळ्या  उपक्रमाचे आयोजन

पुणे  :  आपल्या घरांची निर्मिती करणारे, त्यासाठी राबणारे हात हे कायमच दुर्लक्षित राहतात. त्यांना करमणुकीची फारशी साधने नसतात, किंवा त्याविषयी फारसा विचार होताना दिसत नाही. मात्र काल शुक्रवारची सकाळ या बांधकाम कामगारांसाठी एक वेगळा आनंद देणारी ठरली. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही वेळ काढत, शहरातील काही बांधकाम मजुरांनी स्वत:साठी धावण्याचा निखळ आनंद घेतला. निमित्त होते बांधकाम कामगारांसाठी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे.

सतत कष्ट करणाऱ्या बांधकाम मजुरांना विरंगुळा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये बालमजूरीबाबाबत व विविध कल्याणकारी शासकीय योजनांबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने शहरात प्रथमच बांधकाम कामगारांसाठी या आगळ्या वेगळ्या  उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५० बांधकाम बांधकाम कामगारांनी सहभाग नोंदविला. यामध्ये १२० पुरूष आणि ३० महिला स्पर्धक सहभागी झाले होते.

जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त  ‘द इन्व्हीझिबल वन्स’ या उपक्रमांतर्गत आयोजित या स्पर्धेसाठी मेलजोल ही सेवाभावी संस्था, सहायक आयुक्त कामगार कार्यालय, रोहन अभिलाषा या गृहसंकुलातील रहिवासी आणि रोहन बिल्डर्स यांचे सहकार्य लाभले. कामगार कार्यालयाचे सहायक आयुक्त दत्ता दादासो पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या सहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेस सुरवात झाली. महिला आणि पुरुष अशा दोन गटांत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी महाराष्ट्र कॉर्पोरशनचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त आनंद जोगदंड, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या समन्वयक सपना राठी, सह-समन्वयक  मिलिंद तलाठी, पराग पाटील, लोणीकंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुहास पाटील आणि रोहन बिल्डर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कामगार कार्यालयाचे सहायक आयुक्त दत्ता दादासो पवार म्हणाले, “बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे कामगार कल्याण मंडळाच्या  माध्यमातून ३० कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामागारांनी सर्वप्रथम आपली नोंदणी करून घेण आवश्यक असते. प्रत्येक बांधकाम प्रकल्पावरील अधिकाधिक कामगारांची बीओसीडब्लूअंतर्गत नोंदणी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर एकदा नोंदणी झाल्यानंतर कामगाराने प्रत्येक वर्षी नोंदणीचे नूतनीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी ठेकेदार, एचआर कर्मचारी यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.”

या मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात लतीफा बिवी हिने प्रथम, मर्जिना खातून हिने द्वितीय आणि नर्जिना खातून हिने तृतीय क्रमांक मिळविला. तर पुरुष गटात अंगद कुमार यांनी प्रथम क्रमांक, दीपक साहू याने द्वितीय तर सींथू राम यांनी तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विजेत्यांना बक्षीस म्हणून पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading