fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

कलासाक्षरतेने समाज आणखी समृद्ध होईल – शिल्पकार प्रमोद कांबळे

पुणे : कलासाक्षरतेने समाज आणखी समृद्ध होईल त्यामुळे शालेय शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात कलासाक्षरतेवर भर देणे गरजेचे असल्याचे मत प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी व्यक्त केले. घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा कलादालन येथे आयोजित करण्यात आलेल्या व्हीनस आर्ट फेस्टीव्हल या ४८ चित्रकारांच्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज सकाळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेते, लेखक व निर्माते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी कांबळे बोलत होते.

यावेळी कुलकर्णी यांचा हस्ते डॉ. सुधाकर चव्हाण, डॉ.सुभाष पवार व प्रमोद कांबळे यांचा कलाक्षेत्रातील योगदानासाठी विशेष सत्कार करण्यात आला. व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी आणि आर्ट टुडे गॅलरीचे प्रियंवदा व संजीव पवार याप्रसंगी उपस्थित होते. येत्या १९ जून पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून व्हीनस ट्रेडर्सला चालू महिन्यात ४८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने या व्हीनस आर्ट फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

कांबळे म्हणाले, “सध्याच्या काळात रियाजाचे महत्व कमी होताना दिसत आहे त्यामुळे चित्रकला किंवा इतर कोणतीही दृश्यकला यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित होतांना दिसत नाहीत. संगीतातील स्वराच्या रियाजाइतकेच महत्व या कलेत रेषांच्या रियाजाला आहे. शालेय जीवनातील सुरुवातीच्या काळात म्हणजेच पहिले ते पाचवीच्या दरम्यान कलासाक्षरतेवर भर देणे गरजेचे आहे. इतर विषयांना देण्यात येत असलेले महत्व कला विषयाला दिले जात नाही. तसेच पालक देखील बऱ्याचदा कला साहित्य खरेदी करताना हात आखडता घेताना दिसतात.”

“लहान वयात व्यक्त होण्यासाठी चित्रकला हे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कारण या वयात व्यक्त होण्यासाठी गरजेची असेली शब्दसिद्धी त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांना निबंध लेखन किंवा कवितांच्या माध्यातून व्यक्त होणे सोपे नसते आणि व्यक्त न होता आल्यास त्यांची घूसमट होते. आपण जितके कलेच्या जवळ जावू तितकेच वाईट गोष्टींपासून लांब राहण्यास आपल्याला मदत होईल आणि एक समृद्ध समाज घडवण्यासाठी ते एक महत्वाचे पाउल ठरेल”, असे प्रमोद कांबळे यांनी आवर्जून नमूद केले.

यावेळी बोलताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, “आजच्या काळात जिथे शब्दांना असलेला अर्थ आम्ही सगळेच हरवून बसलेलो आहोत, खूप वाचाळ झालो आहोत, अशा वेळी मूक होत या रंग रेशांकडे जाणं त्यातला आशय शोधणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यातही पुढे जावून आव्हानं अशी दाट झाली आहेत कि रंगांनीसुद्धा विशिष्ट भूमिका घ्यायचा प्रयत्न सध्या चालू केला आहे. त्यातूनही आम्हाला वेगळा आशय शोधावा लागेल आणि रंगांची त्यातून मुक्तता करावी लागेल. अस सगळं वास्तव आजुबाजूला आहे आणि म्हणूनच चित्रकलेचं महत्व खूप जास्त आहे.”

सध्या लोकांना फक्त कलाकर व्हायचा आहे. कला साध्य करायची आहे असे मला वाटत नाही त्यांना कला किती येते हा मोठाच प्रश्न आहे असे म्हणत साधनेचे किंवा रियाजाचे कमी होत असलेले महत्व यावर कुलकर्णी यांनी खंत व्यक्त केली.

डॉ. सुधाकर चव्हाण म्हणाले कि कलेच्या प्रांतात जी हौशी कलाकार, व्यावसायिक कलाकार अशी जी वर्ग झालीन आहे ती योग्य नाही. जो निष्ठेने आणि आणि मनपूर्वक चित्र काढतो तो चित्रकार. डिग्री आहे कि नाही हा प्रश्न फार महत्वाचा नाही. आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिले असते असे निदर्शनास येईल कि अॅकाडेमिक शिक्षण नाही परंतु कलेच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान फार मोठे आहे असे खूप कलाकार आहेत.

सुमारे १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक असलेले डॉ सुभाष पवार म्हणले, “कला महत्वाची, कलेचे माध्यम नाही. मला कलेचे माध्यम म्हणून संगणक जास्त भावतो. १९७२ मध्ये पहिला मिनी संगणक तयार करून आम्ही देशाला समर्पित केला. त्यामुळे संगणकाने माझ्या विविध क्षेत्रातील कार्यावर मोठा प्रभाव टाकला आणि मी या निष्कर्षावर आलो कि चित्रकलेला कोणत्याही माध्यमाचे कोणतेही बंधन नाही. मी माझ्या कलासाधनेला संगणकच हे माध्यम ठरवून काम केले.”

कार्यक्रमात उत्तम साठे या कलाकाराने चारकोल या माध्यमाचा वापर करून तयार केलेले डॉ. सुधाकर चव्हाण यांचे रेखाचित्र यावेळी डॉ. चव्हाण यांना भेट देण्यात आले. तसेच प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारलेली गणपतीची मूर्ती देखील यावेळी डॉ. चव्हाण यांना भेट देण्यात आली.

या आर्ट फेस्टीव्हलला भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हाताचे ठसे कॅनव्हासवर उमटवत प्रदर्शानानंतर हा रंगीबेरंगी आणि आकर्षक दिसणारा कॅनव्हास पुणे विमानतळ प्राधिकरणाकडे सुपूर्द केला जाईल.

व्हीनस आर्ट फेस्टीव्हलमध्ये १८ जून रोजी सायंकाळी ५:३० वाजता चित्रकार विलास कुलकर्णी यांचे जलरंगावरील प्रात्यक्षिक सादर होईल. तसेच रविवारी, १९ जून रोजी लहान मुलांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चित्रकार घनशाम देशमुख यांची चित्रकला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या संपूर्ण उपक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading