सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे.
ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.
सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्याात येणार आहेत. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ १८ व्या स्थानी आहे. २७ एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
