सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण आमदार संजय जगताप यांनी दडपले – विजय शिवतारे
पुणे : एका हॉटेल व्यावसायिकाने काचरा वेचकांवर उकळते पाणी टाकून दोन जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची सासवड येथे जोरदार चर्चा आहे. नुकताच या घटने संबंधी एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. अशातच आज माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार संजय जगताप यांच्यावर या प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. सासवड येथील दुहेरी हत्याकांड प्रकरण पोलिसांवर दबाव आणून आमदार संजय जगताप यांनी दडपले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातील सगळ्यांचे फोन कॉल रेकॉर्ड चेक केले तर हत्याकांडाची खरी माहिती पुढे येईल, अशी मागणी शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी घेवून या दोन्ही मृत व्यक्तीचं शवविच्छेदन करण्यात आले असून या दोघांचा मृत्यू उपासमारीने झाला आहे, असा चुकीचा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. मात्र काही नागरिकांनी मला आणि अधिक्षकांना या संदर्भात सगळी माहिती दिली. त्यानंतर हे धक्कादायक प्रकरण समोर आलं.
नेमकं प्रकरण काय आहे?
मागील 24 मे रोजी दुपारी ऊन्हा पासून वाचण्यासाठी सासवडमधील ताथेवाडीच्या कट्ट्यावर 4 कचरावेचक कामगार बसले होते. या चार कामगारांना अंडाभूर्जी विक्रेत्याने या ठिकाणी का बसला? असा प्रश्न विचारत मारहाण केली आणि त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकले. दुर्दैवाने या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर साथीदार असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सासवडचा बिहार होतोय
सासवड आणि जेजुरी परिसराता याआधी असं भीतीचं वातावरण कधीच नव्हतं. मात्र जेव्हापासून पोलिसांच्या कामकाजात आमदार आणि त्यांचे सहकारी हस्तक्षेप करत आहेत. त्यामुळे निष्पाप नागरिकांचं नुकसान होत आहे. त्यांच्या दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे. सासवड तालुक्यातील ही परिस्थिती चुकीची आहे. गरिबांचा निदान विचार किंवा त्यांना मदत करायची सोडून हे असले धक्कादायक प्रकार घडत आहे. त्यामुळे सासवडचा बिहार होत आहे, असेही शिवतारे म्हणाले.
