पुरुष घरातील स्री’ला व्यक्ती म्हणून वागणूक देईल, तेव्हा बरेच प्रश्न सुटतील – अरुणा सबाने
- दीपा देशमुख यांनी घेतलेल्या मुलाखतीत सबाने यांनी मांडले मत
पुणे : ” घरातील स्त्री ही देखील एक व्यक्ती आहे, तिलाही भावना आहेत, तिलाही नकाराचा अधिकार आहे हे पुरुषांनी समजून घेतले पाहिजे. ज्यादिवशी पुरुष घरातील स्त्रीला चांगली वागणूक देतील, त्यादिवशी महिलांचे बरेच प्रश्न सुटतील,” असे मत लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी व्यक्त केले.
मनोविकास प्रकाशन आणि पुस्तक विश्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी लेखिका दीपा देशमुख यांनी ‘सूर्य गिळणारी मी’ या पुस्तकाच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी पुस्तक विश्व’चे नवनाथ जगताप, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर उपस्थित होते.
सबाने म्हणाल्या,” महिलांचे इतके प्रश्न आहेत की त्या सोडवण्यासाठी कितीही प्रयत्न करा ते कमीच आहे. जोपर्यंत पुरुषांना वाटत नाही की आपण चुकत नाही, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही. दोघांनाही एकमेकांची गरज असते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.”
पाटकर म्हणाले,” महाराष्ट्रात मराठी पुस्तकांच्या दुकानांची दुरावस्था आहे. अनेक जिल्ह्यात मराठी पुस्तकांच्या दुकानांची संख्या सातत्याने कमी होत आहे. शासन दारूच्या दुकानांवरील कर निम्म्याने कमी करते, मात्र मराठी पुस्तकांच्या दुकानांबाबत ही आस्था दिसत नाही. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या दुकानांना लोकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद दिला पाहिजे.”
नवनाथ जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.
