मिलिंद एकबोटे, नंदकिशोर एकबोटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर दोघांनाही पुण्यात येण्यास बंदी
पुणे : दिशाभूल करणारी पत्रके वाटून दोन समाजात तेढ, द्वेष निर्माण व्हावा, यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद रमाकांत एकबोटे आणि नंदकिशोर रमाकांत एकबोट यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यासह 20 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात त्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शरयू सहारे यांनी एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करताना त्यांना पुणे महापालिकेच्या क्षेत्रात प्रवेश न करण्याची अट घातली आहे.
मिलिंद एकबोटे नंदकिशोर एकबोटे यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात आयपीसी 120 (ब), 295अ, 143, 145, 149, 188, 505 (2), माहिती तंत्रज्ञान अधिनियम महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता.
अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करताना न्यायालयाने घातलेली अट रद्द करण्यासाठी नंदकिशोर एकबोटे यांनी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी तपास अधिकारी सरकारी वकील व आरोपींचे वकील यांचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने नंदकिशोर एकबोटे यांचा अर्ज फेटाळून लावला.
