देश अपघातमुक्त होण्यासाठी शासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची – जितेंद्र पाटील
पुणे : देश अपघातमुक्त होण्यासाठी शासन, प्रशासनाबरोबरच मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांची भूमिका महत्वाची आहे. तसेच शालेय शिक्षण विभागाने वाहतूक नियमावलीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा. शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषयक अभ्यासक्रम समाविष्ट केल्यास नवीन वाहन चालकांना प्रशिक्षण देणे यासाठी व्यासपीठ मिळेल. त्यासाठी प्रशिक्षण देण्याकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे असे मत राज्याचे सह परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
प्रादेशिक परिवहन कार्यालय व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात जितेंद्र पाटील बोलत होते. यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, सीआयआरटी चे प्रशांत काकडे, टोयोटा कंपनीच्या संपदा घाग, मारुती वाहन उद्योग समूहाचे नीरज कुदळे व संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाघोले उपस्थित होते.
पाटील म्हणाले, मागील काही वर्षापासून वाहन चालकांचा प्रवास, अपघातमुक्त होण्यासाठी शासन कसोसीने प्रयत्न करत आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूल संस्थांनी आपल्याकडे येणाऱ्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून आपल्या व इतरांच्या कुटूंबाची जिवीत हानी होणार नाही यासाठी कसोसीने प्रयत्न केले पाहिजेत.
रस्ते वाहतूक तज्ज्ञ दत्तात्रय सस्ते यांनी आपल्या भाषणात रस्ते वाहतूक करताना आपला परिवार सुरक्षित आहे का, याचा नितांत विचार करण्याची गरज असून शासन सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना करत आहे. असे असताना सुध्दा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळेच रस्ते अपघातात वर्षाला हजारो नागरिकांचे बळी जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना वाहन चालकांना वाहतूकीचे नियम, रस्ता सुरक्षा, अपघात होण्याची व अपघातामुळे होणारी मनुष्य वित्त हानी याबाबत प्रबोधन करण्याची मोटार ड्रायव्हिंग संचालकांनी अंमलबजावणी करावी असे आवाहन केले.
यशदा या संस्थेचे निवृत्त सहसंचालक डॉ. सुनिल धापटे यांनी सिंहावलोकन करताना युवा पिढीने अनावश्यक फ्लेक्सबाजी इतर अनुत्पादक कामात वेळ घालवण्यापेक्षा वाहतूक प्रबोधन करावे असे आवाहन करून शासन रस्ते अपघातात प्रमाण कमी आणण्याचे कसोसीने प्रयत्न करत असूनही नागरिक व वाहनचालक हे आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली.
पुण्यातील १०० वर्षे पुर्ण झालेल्या आपटे मोटार स्कूलच्या तिसऱ्या पिढीतील विलास आपटे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुळचे पुणेकर असलेल्या मंदार ताम्हाणकर यांनी आस्ट्रेलिया मध्ये गुरू मोटार ड्रायव्हिंग स्कूल ॲकॅडमी ही संस्था स्थापन करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्याबद्दल निवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी योगेश बाग यांनी त्यांची प्रगट मुलाखत घेतली. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून ३००हून अधिक संस्थाचालक सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय दुग्गल, कृष्णा दाभाडे, महेश शिळीमकर ,एकनाथ ढोले, देवराम बांडे, विठ्ठल मेहता इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.