अखिल भारतीय एरोमॉडेलिंग स्पर्धा – एरोस्किल्स 2022
पुणे : रबर बॅन्डला पीळ देऊन उडणारी विमाने आपण सर्वांनी पाहिलेली असतात. पण त्यांचे उड्डाण खूपच थोडा वेळ होते व तेही फार प्रेक्षणीय नसते अशी तक्रार अनेकजण करतात. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर रबर पॉवर्ड विमाने उडवण्याच्या ज्या स्पर्धा होतात त्या विशेष प्रतिष्ठेच्या समजल्या जातात. विशेषत: यामधील F1D या प्रकारातील, बंदिस्त हॉलमधे (इनडोअर) होणाऱ्या स्पर्धांमधील उड्डाणांचे तपशील वाचले तर अक्षरश: तोंडात बोट घालायची वेळ येते. ही विमाने कमाल 3 ग्रॅम वजनाची असतात व केवळ एका रबरबॅन्डवर वीस ते तीस मिनिटांची उड्डाणे करतात. याचा जागतिक उच्चांक आहे तो 61 मिनिटांच्या सलग उड्डाणाचा ! !
परंतु अतिशय कमी खर्चात अत्यंत अचूक विमाने बनवण्याच्या या छंदाची माहिती फारच कमी लोकांना आहे. खरं तर इंजिनियर, संशोधक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा छंद अतिशय उपयुक्त आहे. उच्च दर्जाचे हस्तकौशल्य, विज्ञान, भूमिती, विमानशास्त्र यातील अनेक तत्वे व तंत्रे यातून समजतात. शिवाय रबरासारखी असमान ताकदीची वस्तू वापरताना पॉवर मॅनेजमेंट म्हणजे काय तेही लक्षात येते. म्हणूनच अमेरिकेतील सायन्स ऑलिंपियाड मधे यांचा समावेश केलेला आहे. नासा देखील यांचा वापर प्रगत प्रशिक्षणासाठी करते. मॅनेजमेंट ट्रेनिंग मधील सिक्स सिग्मा या प्रशिक्षण पध्दतीतही यांचा वापर करतात.
या महत्वपूर्ण छंदाची ओळख शालेय व महाविद्यालयीन तरुणांना व्हावी यासाठी शास्त्रवाहिनी आणि इंजिनियरिंग कॉलेजातील तरुणांनी चालवलेला एलेरिओज एरो क्लब यांनी AEROSKILLS-2022 या नावाने एका अखिल भारतीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. यासाठी जगप्रसिद्ध BAE Systems यांनी विनामूल्य शिबिरे व बक्षिसे यासाठी आर्थिक साहाय्य दिले आहे. या स्पर्धेत भाग घेणाराला एक लेसर कट केलेला किट मिळेल. यू ट्यूबवरील व्हिडीओ व प्रत्यक्ष मार्गदर्शन याव्दारे हे आठ ते दहा ग्रॅम वजनाचे विमान बनवून त्याचे मोकळ्या मैदानात उड्डाण करून त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे. यामधून सर्वात जास्त वेळाची उड्डाणे करणाऱ्या तिघांना 5000, 3000 व 2000 ची रोख बक्षिसे व BAE Systems तर्फे प्रमाणपत्रे मिळतील. तसेच भाग घेतलेल्या व व्हिडीओ पाठवणाऱ्या सर्वांनाच BAE Systems तर्फे सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल.
यासाठी भारतभरातून प्रवेशिका येत आहेत व आजवर 70 स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. आणखी 80 जणांची नोंदणी घेता येणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख 15 एप्रिल 2022 आहे. विशेष बाब म्हणून पुण्यातील स्पर्धकांसाठी याचे विनामूल्य शिबिर 9 व 10 एप्रिल रोजी होणार आहे. रजिस्ट्रेशन व अधिक माहिती http://www.alerios.in या वेबसाइटवर मिळेल. तसेच 9209339046 या क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज पाठवल्यास माहिती पाठवली जाईल.
