गाळ्यांचे भाडे न भरल्याने पुणे महापालिकेने २७ गाळे केले सील
पुणे : पुणे महापालिकेकडून भाड्याने घेतलेल्या गाळ्यांचे भाडे न भरल्याने २७ गाळे सील केले आहेत.
या गाळेधारकांकडे ३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. शहरात महापालिकेच्या एकूण ३ हजार ८९९ मिळकती आहेत. काही मिळकती ‘आर ७’ अंतर्गत ताब्यात आल्या आहेत. तर काही महापालिकेने बांधकाम केलेल्या १९ प्रकारच्या मिळकती आहेत. महापालिकेने त्याची गाळे, दुकाने, हॉल असे २६९ मिळकती व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने दिले असून त्यातील आत्तापर्यंत ५९ कोटींपैकी ३७ कोटी रुपये थकबाकी वसूल झाली आहे. तर अद्याप २२ कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे.
थकबाकीदारांकडून वसुलीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, जे भाडेकरू थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्या वास्तु व गाळे सील करण्यात येत आहेत. महापालिकेने रविवार पेठेतील ३, टिळक रस्त्यावरील ढेरे उद्योग भवन येथील गाळा क्रमांक. ५, वाकडेवाडी येथील गाळा क्रमांक. २, घोरपडे पेठेतील प्रियंकाजी महिला उद्योग समूहाला दिलेले १३ गाळे, सावरकर भवन येथील सहा गाळे आणि येरवडा येथील हुले कॉम्प्लेक्समधील ३ गाळ्यांचा समावेश आहे. टिळक रस्त्यावरील ढेरे उद्योग भवनमधील येथील एका गाळ्याची सर्वाधिक १ कोटी ५ लाख रुपये आहे. तर सावरकर भवन येथील ६ गाळ्यांची १ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे. आंबेगाव येथील मैदान पुरंदर टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्वावर दिले होते. ते मैदान देखील ताब्यात घेतले आहे.अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.
