संत तुकारामांच्या अभंग रचनांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे  : संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या एकाहून एक सरस अभंगांचे सादरीकरण आणि अतिशय सहज परंतु तितक्याच प्रभावीपणे करण्यात आलेले  निरूपण ऐकत, भक्तीमय अशा वातावरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. टाळ्यांचा गजरात उस्फुर्त प्रतिसाद देत उपस्थितांनी या सांगीतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. 

 बेलवलकर सांस्कृतिक मंच या संस्थेचे अजित व समीर बेलवलकर यांच्या पुढाकाराने  आयोजित ‘तुका आकाशा एवढा’ या विशेष सांस्कृतिक उपक्रमानंतर्गत दिनांक २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता टिळक स्मारक मंदिर येथे संत तुकाराम यांच्या अभंगांवर आधारित ‘अभंगवाणी’ हा  सांगीतिक कार्यक्रम संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ऋषीकेश बडवे यांनी राजस सुकुमार मदनाचा पुतळा’,’वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘श्री अनंता मधुसूदना पदमनाभा नारायणा’,’विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म’ या रचना सादर केल्या. प्राजक्ता रानडे यांनी गायलेल्या ‘भेटी लागे जीवा’, ‘खेळ मांडीयेला वाळवंटी ठायी’ या अभंगांना रसिकांनी टाळ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला. सचिन इंगळे यांनी ‘देवा आता ऐसा करी उपकार’, ही रचना सादर केली. कार्यक्रमाच्या पूर्वाधाची सांगता ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या अभंग सादरीकरणाने झाली. 

तर उत्तरार्धात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित आनंद भाटे यांच्या गायनाने कार्यक्रमाने वेगळी उंची गाठली. त्यांनी सादर केलेल्या ‘शेवटचा दिस गोड व्हावा’,’काय करू जीव होतो कासावीस’,’ धाव घाली आई, आता पाहतेसी काय’ या रचनांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

यावेळी अमृता ठाकूर देसाई (कीबोर्ड), राजेंद्र हसबनीस (तबला), प्रसाद जोशी (पखवाज), आदित्य आपटे (तालवाद्य), रमाकांत परांजपे (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. सदर कार्यक्रमात  निरूपणाची जबाबदारी चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांभाळली आणि राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: