तथागत गौतम बुद्ध विपश्यना विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालयाचे लोकार्पण

पुणे : “बौद्ध धर्माच्या आचार, विचारांत शास्त्रोक्त विपश्यनेला अतिशय महत्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मौन, विपश्यना गरजेची आहे. त्यातून विचारांची शुद्धी होते. मनाची जडणघडण होते. विपश्यना विहारातून, येथील अभ्यासिका व ग्रंथालयातून समाजाचे वैचारिक आरोग्य अधिक सदृढ होईल,” असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या विकासनिधी व संकल्पनेतून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनरल बी. सी. जोशी प्रवेशद्वाराशेजारी साकारण्यात आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध विपश्यना विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका व ग्रंथालयाचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते झाले. प्रसंगी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र नेते परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष शैलेन्द्र चव्हाण, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, रिपाइं महिला सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रीय निमंत्रक मंदार जोशी, सचिव महिपाल वाघमारे, पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता आठवले, शहराध्यक्षा शशिकला वाघमारे, आनंद छाजेड, औंध-बाणेर प्रभाग समिती अध्यक्षा स्वप्ना रायकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “भाजप-रिपाइंचे नाते घनिष्ट आहे. ‘रिपाइं’च्या सामंजस्य, प्रभावी योगदानामुळे भाजपाला त्यांचा योग्य वाटा द्यावा लागतो. भविष्यात हे दोन्ही पक्ष एकत्रित राहतील आणि सत्ता प्रस्थापित करतील. सुनीता वाडेकर यांच्या पुढाकारातून आणि परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून हे सुंदर काम उभा राहिले आहे. पुण्यातील भाजप-रिपाइंच्या नगरसेवकांनी विलोभनीय असे काम केले आहे. उपमहापौर मिळाल्यानंतर ‘रिपाइं’ने त्याचा चांगला उपयोग करत आपापल्या भागाचा विकास केला आहे, याचा मला अभिमान वाटतो. पाच वर्षांतील भाजप-रिपाइंच्या नगरसेवकांच्या विकासकामांचे पुस्तक व्हायला हवे.”
सुनीता वाडेकर म्हणाल्या, “गेल्या चार वर्षांपासून या विहाराचे काम सुरु होते. माझ्या कार्यकाळात ही वास्तू साकारली, याचे समाधान आहे. नागरिकांना ध्यानधारणा, विपश्यनेसाठी एक चांगले केंद्र उपलब्ध झाले आहे. अभ्यासिका आणि ग्रंथालयामुळे या भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खऱ्या अर्थाने हे स्मारक झाले आहे. वाडेकर यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि लोकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अशी चांगली कामे उभारू शकले.”
कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन दिपक म्हस्के यांनी केले. अविनाश कदम यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: