किशोरवयीन मुलीची व्यथा मांडणाऱ्या ‘पोटरा’चे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये यश
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलीची होणारी परवड आणि व्यथा मांडणाऱ्या शंकर धोत्रे दिग्दर्शित ‘पोटरा’ या चित्रपटाने आणखी एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आपली छाप उमटवली आहे. टर्की येथील ‘हेलीकार्नेसस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२२’ मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाची म्हणून पोटराची निवड करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दुसऱ्यांदा या चित्रपटाची दखल घेण्यात आली आहे.
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या सामाजिक, वैयक्तिक घटना आपल्या मनावर नेहमीच प्रभाव पाडतात. मात्र, हे विषय चित्रपटातून मांडले गेले तर त्यातून सामाजिक मानसिकतेत बदल घडवून आणता येईल हा विचार शंकर धोत्रे या तरुणाने केला आणि अशाच एका विषयावर पोटरा या सिनेमाची निर्मिती झाली. पोटरा म्हणजे ज्वारीचं अपरिपक्व कणीस. हे कणीस कापणीला जाईपर्यंत त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. किशोरवयीन मुलींचे आयुष्यही याप्रमाणेच असते. आपण जसे ज्वारीच्या पीकाच्या या अपरिपक्व कणसाची जीव लावून देखभाल करतो तशीच देखभाल या किशोरवयीन मुलींची व्हायला हवी असा विषय या चित्रपटातून मांडला आहे.
आपल्या आसपास राहणाऱ्या किशोरवयीन मुलींना घर आणि समाजातून दिली जाणारी वागणूक, त्यांच्यावर लादली जाणारी बंधने ही स्पष्ट दिसायची. मुलींचे जीवन असे का असा प्रश्नही अनेकदा पडायचा. त्यामुळे या विषयाला व्यासपीठ मिळावे यासाठी ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न मी केला. चित्रपटातील मुख्य पात्र साकारलेली मुलगी म्हणजे छकुली प्रल्हाद देवकर ही ग्रामीण भागातील असून तिच्या घरची परिस्थितीदेखील अतिशय बिकट आहे. चित्रपटातील मुख्य पात्र आणि छकुली दोघीही साधारण एकाच वयाच्या असल्याने ती या भूमिकेसाठी योग्य वाटली. तिला हा विषय समजावून सांगण्यापासून ते चित्रपटात ही भूमिका साकारून घेणे तसे अवघड काम होते. यासाठी तिची तयारी आम्ही करवून घेतली. जवळपास तीन महिने तिला आमच्या सोबत राहायला आणले आणि हा विषय समजावून सांगितला. चित्रपटाचे निर्माते शरद शिंगाडे यांचे चित्रपट निर्मितीसाठी मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे आणि स्वप्नजा राजेनिंबाळकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
चित्रपटातील सर्व कलाकार ग्रामीण भागातील असून मुख्य पात्र छकुली प्रल्हाद देवकर हिने साकारले आहे. तसेच सुहास मुंडे, दीपाली कांबळे, नंदा काटे, श्रेयस हनवटे, महेश माने, उर्मिला जाधव, बाळासाहेब साठे या कलाकारांनी चित्रपटात भूमिका साकारली आहे.
