Monday, November 2, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ म्हणून केलेला उल्लेख दुर्दैवी – खासदार सुप्रिया सुळे 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राचा ‘सुपरस्प्रेडर’ असा केलेला उल्लेख धक्कादायक असून त्यांच्याकडून या विधानाची अपेक्षा नव्हती. महाराष्ट्राची लेक आणि महाराष्ट्राची खासदार म्हणून आपल्याला प्रश्न विचारतेय की, आपण महाराष्ट्राबद्दल गैरसमज पसरवणारं वक्तव्य का केलं? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच हा राज्याच्या अस्मितेचा विषय असून भाजपातील आमदार-खासदारांनीही याचा जाब विचारावा, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणादरम्यान सोमवारी संसदेत महाराष्ट्रामुळे कोरोनाचा प्रसार झाला, असा उल्लेख केला होता. या उल्लेखानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेवून पंतप्रधानांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत टीका केली. पंतप्रधानांना उददेशून त्या म्हणाल्या, “कोरोनाच्या काळात लोकांनी एकमेकांना मदत केली. माणूसकीचे दर्शन घडविले. ‘प्रधानमंत्रीजी, ‘आप से नाराज नहीं हूँ, हैराण हूँ मै आपसे’, असा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील जनतेने भाजपाचे १८ खासदार निवडून देऊन नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. मोदींनी महाराष्ट्रावर अशा प्रकारे केलेले आरोप हे दुर्दैवी असून त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांचा हा अपमान आहे, अशी टिकाही त्यांनी केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “देश बिकट अवस्थेतून चालला आहे. अशावेळी आपल्या भाषणातून पंतप्रधान देशाला दिशा देतील, अशी अपेक्षा होती. पण त्यांनी महाराष्ट्राबद्दल जे बोलले ते खुप दुःखद आहे. ज्या राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले.त्यांना प्रधानमंत्री करण्यात महाराष्ट्राच्याही मतदारांचाही मोलाचा हात आहे.त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान त्यांनी कोविड सुपरस्प्रेडर म्हणून केला. हे धक्कादायक आहे.”

कोरोनात ‘हे’ लोक मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते
जेंव्हा देशात कोरोनाचा प्रसार होत होता तेंव्हा ‘हे’ लोक मध्य प्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. त्या म्हणाल्या, “कोरोनाचा प्रसार होण्यापुर्वीचे जे संसदेचे अधिवेशन होते त्या अधिवेशनात तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगता रॉय हे यांनी सभागृहात प्रधानमंत्र्यांकडे पायी चालत जाऊन प्रत्यक्ष विनंती केली होती की कृपया अधिवेशन आता थांबवू. खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ द्या. पण त्यांनी त्यावेळी ते ऐकले नाही. कारण ते मध्यप्रदेशातील सरकार पाडण्यात व्यस्त होते.”

Leave a Reply