नेमका नकाशा खरा की अधिसूचना खरी हे प्रशासनाने स्पष्ट करावे – उज्ज्वल केसकर
पुणे : येरवडा येथील लूप रस्ता हा प्रभाग क्रमांक ९ च्या उत्तरेची सीमा असल्याचे अधिसूचनेत दाखविण्यात आले आहे. मात्र, नकाशात हा भाग प्रभाग क्रमांक १० मध्ये गेला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा ताळमेळ लागत नसल्याने नेमका नकाशा खरा की अधिसूचना खरी, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी माजी नगरसेवक व विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाकडे आराखडा गेल्यानंतर मुंबईतील बड्या नेत्यांनी तसेच पुण्यातील नेत्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. या बदलांमधून भाजपचे बालेकिल्ले असलेल्या विधानसभा मतदार संघांतील प्रभागांची संख्या कमी झाली. शिवाय अनेकांचे प्रभागच गायब झाल्याने विद्यमान नगरसेवक एकमेकांच्या समोर उभे राहिले आहेत. तर काहींना सोयीचा भाग बघून प्रभागांवर दावा करण्याची नामुष्की ओढवली आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेससह राष्ट्रवादीच्याही काही नगरसेवकांसाठी प्रभागरचना अडचणीची ठरत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. प्रारूप प्रभागरचनेत विचित्र प्रभाग तयार झाले आहेत. सोसायट्यांच्या चार इमारती एका प्रभागात तर उर्वरित इमारती दुसऱ्या प्रभागात असल्याचे अनेक ठिकाणी झाले आहे. शिवाय रस्ते, नाले या नैसर्गिक सीमांचाही विचार झालेला नाही. कोथरूड, हडपसर, पर्वती, खडकवासला, शिवाजीनगर, कसबा पेठ या मतदारसंघांत अशी तोडफोड झाल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जात आहे.
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेत करण्यात आलेल्या तोडफोडीमुळे विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले असताना, आता महापालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या आराखड्यात तब्बल ६० टक्के बदल झाला असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. यावेळी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग असणार आहे. २०११च्या जनगणनेनुसार ३५ लाख पुणेकर १७३ नगरसेवक निवडून देणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेने प्रभाग रचना तयार केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला. ६ डिसेंबर रोजी महापालिकेने निवडणूक आयोगाकडे प्रारूप आराखडा सादर केला. त्यानंतर आयोगाने हा आराखडा योग्य पद्धतीने तयार केला आहे का? हे तपासण्यासाठी बोलाविले होते. त्यामध्ये तब्बल २४ बदल करण्यास सांगितले होते. या २४ बदलांचा शहराच्या बहुतांश भागावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच आराखडा जाहीर करण्यापूर्वी आणखी १२ बदल सुचविण्यात आले. दरम्यान ६ डिसेंबरनंतर आमच्याकडून एकही बदल सुचविला गेला नसल्याचे प्रशानाकडून सांगण्यात येत आहे.
