Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

अनेक विद्यमान नगरसेवक डेंजर झोनमध्ये

पुणे : पुणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रारूप प्रभाग रचना हरकती व सूचनांसाठी आज जाहीर करण्यात आली.

नव्याने समाविष्ट झालेली ३४ गावांचा समावेश आणि अस्तित्वातील चार सदस्यीय प्रभाग रचनेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याने निवडणुकी अगोदरच ‘विद्यमान’ नगरसेवकांपैकी अनेकांना एकतर पक्षांतर करणे, प्रभाग बदलणे अथवा घरी बसावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. नवीन प्रभाग रचनेचा सर्वाधीक फटका सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना बसणार असल्याचे दिसून येत आहे. पुणे महापालिकेने ५७ त्रिसदस्यीय आणि एक द्विसदस्यीय अशा ५८ प्रभागांच्या हद्दीची चतु:सीमा, नकाशे आणि प्रभागांच्या नावांची यादी आज जाहीर केली आहे.

महापालिकेमध्ये मागील चार वर्षांत ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे महापालिकेची भौगोलिक हद्द विस्तारली असून मतदारसंख्याही वाढली आहे. मागील निवडणुका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने झाल्या होत्या, तर यंदाची निवडणुक त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने होत असल्याने बहुतांश प्रभागांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली आहे. 

मागील निवडणुकीमध्ये १६२ नगरसेवकांच्या संख्येमध्ये सत्ताधारी भाजप- रिपाइं  आघाडीचे ९९ नगरसेवक निवडूण आले . विशेष असे की बहुतांश प्रभागात चारही नगरसेवक भाजपचेच  आहेत. तर केवळ दोन प्रभागांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चार नगरसेवक आहेत. त्यामुळे नव्या रचनेत प्रभागांची तोडफोड झाल्याचा सर्वाधिक फटका हा भाजप नगरसेवकांनाच बसणार आहे. दुसरीकडे यंदा राज्यातील महाविकास आघाडीतील  राष्ट्रवादी , कॉंग्रेस आणि शिवसेनेने आघाडीमध्ये निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर कॉंग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने स्वबळाचा नारा दिला आहे. परंतू तूर्तास तरी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि कॉंग्रेसचे प्रत्येकी दहा- दहाच नगरसेवक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित लढल्यास महाविकास आघाडीतील विद्यमान नगरसेवक सेफ राहीले तरी उमेदवारी न मिळाल्याने इच्छुक उमेदवार पक्षांतर अथवा बंडखोरी होण्याची शक्यताही मोठ्याप्रमाणावर आहे. त्यामुळे नवीन प्रभाग रचनेचा विद्यमान नगरसेवकांना तितकासा फटका बसला नाही तरी महाविकास आघाडीतील दुसर्‍या फळी कोलमडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading