Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

विवेकाचा आवाज जिवंत ठेवणे गरजेचे : भारत सासणे

पुणे : समाज संमोहित आहे, अंधार्‍या गर्तेत बुडत आहे, एकमेकांपासून दूर जात असून विभाजित होत आहे. विवेकाचा आवज क्षीण असतो; तो जीवंत ठेवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा नियोजित उदगीर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, कथाकार, साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केली. मराठीबाबत न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही, मराठी भाषा ही अभिजातच आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

उदगीर येथे होत असलेल्या 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सासणे यांचा साहित्य संस्थांची मातृसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे नुकताच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना सासणे बोलत होते. साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, राजीव बर्वे, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्या हस्ते सासणे यांचा सत्कार करण्यात आला.

सासणे म्हणाले, काळ संमिश्र आहे, सर्वसामान्यांचे जगणे गूढ आहे. जीवन एकरेषीय नसून व्यामिश्र आहे. लेखकाने या अनुषंगाने बोलले पाहिजे. मौन चतुर आहे. बोललो तर काय होईल, नाही बोललो तर काय होईल असा विचार लेखकाने न करता सत्याला वाचा फोडली पाहिजे. संमेलनाध्यक्ष निर्भय असावा हा मुद्दा अधोरेखित करून सासणे म्हणाले, अध्यक्ष सर्वांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे जाणारा-येणारा, हिंडणारा असा मी अध्यक्ष आहे. समाजाची सांस्कृतिक भूक, गरज ओळखून काम करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. साहित्य संमेलनात इतर विषय चर्चिले जातात पण संमेलनाच्या व्यासपीठावरून साहित्यविषयक विचारच प्रकट व्हावेत ही अपेक्षा अध्यक्षपदाच्या मर्यादेत राहून पूर्ण करण्याचे आश्वासनही सासणे यांनी दिले.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, संमेलनाध्यक्ष चालता-बोलता असावा या साहित्य महामंडळाच्या भूमिकेशी मी सहमत नाही.

राजीव बर्वे म्हणाले, सासणे त्यांच्या गूढ लिखाणाप्रमाणेच गूढ वाटतात परंतु ते अत्यंत सहृदयी आहेत. त्यांनी आतापर्यंत कधीही वादग्रस्त विधाने केलेली नाहीत. प्रकाशकांच्या सासणे यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. वाचनसंस्कृतीची पिछेहाट का होत आहे, मराठीची गळचेपी का होत आहे या विषयावर सासणे यांनी प्रकाश टाकावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक प्रकाश पायगुडे यांनी केले. तर आभार सुनिताराजे पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading