fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

साहित्य संमेलनाची सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी मनाला उभारी देणारी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. यंदाचे हे ९४ वे संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे, याचा विशेष आनंद आहे. जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावत असताना आता आपल्याला आपलं जगणं पुन्हा नव्या दमाने, जोमाने पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

राज्याचे भाषा व उद्योग विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश या कार्यक्रमात वाचून दाखवला. या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माझा मराठीची बौलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!’ असे सांगणाऱ्या विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हे ७२५ वे म्हणजेच सप्तशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी केवळ भाषा नाही. ती संस्कृती आहे. या भूमिकेतून मराठी मुलुख एकत्र रहावा यासाठी महाराष्ट्रपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांचे स्मरण करणेही आपले कर्तव्य आहे. या सर्व हुतात्म्यांना माझे त्रिवार वंदन.

यंदाचे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. महाराष्ट्राने ज्ञान-विज्ञानाचा वसा प्रयत्नपूर्वक जतन केला आहे. मराठी साहित्य विश्वानेही मनोरंजन, विरंगुळा याच बरोबर वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याची भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरावर प्रबोधनात्मक असा घाव घालण्याचे धारिष्ट्यही दाखवले आहे. असा वैज्ञानिक वारसा जपणाऱ्या वाटचालीत संमेलनाचे अध्यक्षपद  जगद्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर भूषवणार आहेत, ही अभिमानाची बाब आहे.

जगद्गगुरू संत तुकोबारायांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन’ या ओळींप्रमाणे हे अक्षरांचे अक्षय धन लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत असतो. या संमेलनाच्या संयोजनाचा मान दुसऱ्यांदा पटकावणारे नाशिककर गोदाकाठचा हा मेळा संस्मरणीय करतीलच. पण या संमेलनातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसह, आपल्या लेखन प्रयोगांतून मराठीला आणखी समृद्ध, संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना मानवंदना दिली जाईल. यातून मराठीतील विविध साहित्यिक प्रवाहांतील नव्या दमाच्या प्रतिभावंताना प्रेरणा मिळेल. या सगळ्या प्रयत्नांतून नानाविध प्रतिभेचे, सर्जनशील असे अनेक लिहिते हात पुढे येतील अशी अपेक्षा आहे. साने गुरूजींच्या ‘..जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱ्या या मराठीत विज्ञानेश्वर घडावेत, अभिरूची संपन्न महाराष्ट्र घडावा, हीच आकांक्षा आहे. संमेलनात प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास या स्मरणिकेच्या प्रकाशनास तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीला मनःपूर्वक शुभेच्छा या संदेशातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading