St strike : संप मागे घ्या अन्यथा पगार कपात करू – राज्य परिवहन मंत्री अनिल परब
मुंबई : परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा मुद्दा हा राज्यशासनाच्या हातात नाही. तो न्याय प्रविष्ट आहे. त्यावर राज्य शासन काहीही करू शकत नाही. परंतु, भरगोस पगारवाढ करूनही कर्मचारी एका मागणीसाठी संपावर आडून बसले आहेत. हे चुकीचे आहे. पगारवाढ करूनही संप सुरूच राहणार असेल तर पगार कपातीचा निर्णय घेवू, असा इशारा राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.
अनिल परब यांची आज एसटी कामगारांच्या कृतीसमिती सोबत चर्चा झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत परब बोलत होते.
परब म्हणाले, जवळपास 10 हजार कामगार कामावर रुजू झाले आहेत. मात्र, अनेक जण संपावर ठाम आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी शासनाने नेहमीच दरवाजे उघडे ठेवले आहेत. आजच्या बैठकीत कृती समितीने पगारवाढीतील अडचणी स्पष्ट केल्या. पगारवाढ मूळ वेतनात दिली असल्याने ग्रेड मध्ये फरक पडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर संप संपल्यावर सविस्तर चर्चा करू असे आश्वासन आम्ही दिले आहे. कर्मचाऱ्यांचे नुकसान आम्ही करणार नाही पण कामगारांची बेशिस्त ही खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
पगारवाढ देवूनही संप सुरू असेल तर पैसे न देता संप सुरू राहिला तर काय फरक पडणार आहे?, असे म्हणत अप्रत्यक्ष रित्या पगार कपातीचा इशारा दिला आहे. तसेच ज्यांना कामावर रुजू व्हायचे आहे त्यांनी लवकरात यावे, त्यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेवू, असे ही त्यांनी सांगितले.
10 हजार कर्मचारी कामावर परतले
पगारवाढी नंतर राज्यात जवळपास 10 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे पोलिस संरक्षणात अनेक डेपो मधून एसटी सुरू करण्यात आली असल्याचे ही परब यांनी सांगितले.
