संविधानाच्या कायद्याने मिळाला प्रत्येकाला सन्मान व अधिकार – डॉ. दत्ता कोहिनकर

पुणे : “गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार देशाला हितकारक आहेत. त्यांच्या विचारांच्या आदर्शातून चांगल्या समाजाची निर्मिती होईल. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या कायद्यामुळे प्रत्येकाला समान अधिकार, न्याय आणि सन्मान मिळाला आहे. त्यांनी दिलेला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा संदेश आपण समजून घेतला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.

संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान सन्मान समिती, सम्यक ट्रस्ट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन, व्याख्यान व मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात डॉ. कोहिनकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण होते. रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते गंगाधर आंबेडकर, सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. मोहन वाडेकर व आदिवासी बांधवांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या सुनिता भोसले यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, ‘रिपाइं’ नेते परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, महिला आघाडीच्या संगीता आठवले, शशिकला वाघमारे, संपर्कप्रमुख अशोक कांबळे, अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव बाबुराव घाडगे, माहिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, शाम सदाफुले आदी उपस्थित होते.

गिरीश बापट म्हणाले, “संविधानाने आपले अधिकार, हक्क आणि जबाबदारी निश्चित केली. मात्र, आपण बाबासाहेबांना पूर्णतः ओळखण्यात कमी पडतो. हा देश संविधान चालवत आहे. विचारांचा लढा विचारांनी लढला पाहिजे.

रमेश बागवे म्हणाले, “सामाजिक सलोखा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाचे महत्व समजून घेतले पाहिजे. जातीवादी, धर्मांध व संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

ऍड. मोहन वाडेकर म्हणाले, “ज्ञानाचे दालन उघडण्याचे काम संविधानाने केले. बाबासाहेबांनी संघर्षाची, न्यायाची, हक्काची शिकवण दिली. जाती-धर्मात विभागलेल्या भारत देशाला एकसंध, धर्मनिरपेक्ष ठेवण्याचे काम संविधानाने केले. घराघरांत संविधान पोहोचवण्याचे काम आपण करायचे आहे.”

सुनीता भोसले म्हणाल्या, आदिवासी समाजाला बाबासाहेब उशिरा समजले. पारधी, कैकाडी, बंजारी, भिल्ल आदी भटक्या समाजापर्यंत संविधान पोहोचण्यासाठी वाड्या-वस्त्यांवर संविधान सन्मान कार्यक्रम होणे गरजेचे आहेत.

 

Leave a Reply

%d bloggers like this: