चारित्र्याच्या संशायवरुन पत्नीने पतीच्या डोक्यात घातला दगडी पाटा, पतीचा जागीच मृत्यू

सोलापूर : चारित्र्याच्या संशायवरुन राहत्या घरामध्ये डोक्यात दगडी पाटा घालून पत्नीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना करमाळा तालुक्यातील खडकी येथे घडली. सुदाम शामराव गायकवाड (वय 52, रा. खडकी, ता. करमाळा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मृत व्यक्तीचा लहान भाऊ रावसाहेब शामराव गायकवाड (वय 42, रा. खडकी, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. सुदाम व त्याची बायको सुनीता हे दोघे जण खडकी येथे वास्तव्यास होती. तर त्यांची तीन मुले मोलमजूरीसाठी बाहेरगावी असतात. सुदामची पत्नी नेहमी पतीवर संशय घ्यायची. त्यामुळे दोघामध्ये सतत भांडणे व्हायची. रविवारी देखील असेच झाले असावे अन् त्यातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. सदर प्रकार नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुदाम रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला व त्याच्या तोंडावर गंभीर दुखापत झालेली होती. घराचा समोरील बाजूचा आतमधून दरवाजा बंद तर मागील दरवाज्यास बाहेरुन कुलूप होते. सुदामला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी सुदामच्या पत्नीकडे अधिक तपास केला असता आपणच दगडी पाटा तोंडावर मारुन सुदाम याला जिवे मारल्याचे कबूल केले आहे. पण त्यामागील कारण सांगण्यास मात्र नकार दिला. सोलापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: