मानसिक, शारीरिक आरोग्याचा समतोल महत्त्वाचा – भूषण गोखले

पुणे : “उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्य हा सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. वैचारिक, मानसिक व शारीरिक आरोग्याचा समतोल साधला पाहिजे. तणावमुक्त जीवन, नियमित व्यायाम आणि पोषक आहार याचा समावेश आपल्या जीवनशैलीत असावा. वायुदलात काम केल्यामुळे आयुष्यात शिस्त आणि कणखरपणा आला. सैन्यातील अधिकारी म्हणून देशाची सेवा करता आल्याचे भाग्य मला लाभले, याचा अभिमान वाटतो,” असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.

द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबज् आणि सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने गोखले यांच्या हस्ते लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनच्या विश्वस्त लायन अरुणा ओसवाल यांना समाजरत्न, जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉ. विनोद शहा यांना समाजमित्र, तर अंध ज्यूदो चॅम्पियन रेणुका साळवे यांना दिव्यज्योति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच जागतिक मधुमेह दिनानिमित्त आयोजित मोफत मधुमेह तपासणी, मधुमेहतज्ज्ञ डॉ. संजय गांधी यांचे मधुमेहावर, स्काय क्लिनिकचे संचालक डॉ. मंदार देव यांचे कोरोनानंतरची जीवनशैलीवर, तर आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा भोसकर यांचे आहार नियोजनावर व्याख्यान झाले.

शुक्रवारी बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या बन्सीरत्न सभागृहात झालेल्या या सोहळ्याला सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन हेमंत नाईक, उपप्रांतपाल लायन राजेश कोठावदे, माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन नरेंद्र भंडारी, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल व मधुमेह जनजागृती कार्यक्रमाचे संयोजक लायन चंद्रहास शेट्टी, लायन श्याम खंडेलवाल, लायन सतीश राजहंस, लायन शरद पवार, लायन ज्योती कुमार अगरवाल, लायन विजय रोडे, लायन अभय गांधी आदी उपस्थित होते.

अरुणा ओसवाल यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. ओसवाल म्हणाल्या, “स्वतःचा आत्मविश्वास, प्रामाणिकपणा आपल्याला यशाकडे नेतो. माझे पती अभय ओसवाल यांच्याकडून प्रेरणा मिळाली. आपल्या कामातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. पैशांपेक्षा सामाजिक भावनेतून केलेल्या कार्यामुळे समाजाकडून आत्मीयता मिळते. लायन्स क्लबच्या माध्यमातून मला चांगले काम उभारता आले, याचे समाधान आहे. या पुरस्कारामुळे आणखी जोमाने कार्य करण्याची उर्जा मिळाली आहे.”

तणावमुक्त, आनंदी जीवन जगलो, तर आपण मधुमेह व इतर आजारांना दूर ठेवू शकतो, असे हेमंत नाईक यांनी सांगितले. डॉ. विनोद शहा, नरेंद्र भंडारी, राजेश कोठावदे यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात चंद्रहास शेट्टी म्हणाले, “मधुमेहाबाबत जनजागृतीसाठी गेली १८ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. सामाजिक कार्य करणाऱ्या सेवाव्रतीला सन्मानित करण्यात येते.” सूत्रसंचालन पल्लवी देशमुख, रचना जाजू यांनी केले. विजय जाजू यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: