‘स्वर-रंग’ या कार्यक्रमाद्वारे रसिकांनी घेतला चित्र- प्रकाशचित्र व संगीताच्याअनोख्या कार्यक्रमाचा आस्वाद  

पुणे : ज्येष्ठ प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त पाकणीकर कुटुंबीयांच्या वतीने नुकतेच ‘स्वर-रंग’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीत, चित्रकला, प्रकाशचित्रकला, नाट्य व उद्योग क्षेत्रातील अनेक नामवंत या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या वेळी प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांनी युवा कलाकार मानस गोसावी यांच्या मोहनवीणा वादनाबरोबर चित्र प्रात्यक्षिक सादर केले. मानस गोसावी यांनी प्रथम गणेशवंदना सादर केली. त्यानंतर यमन रागात आलाप व जोड यांचे सादरीकरण केले. राग यमन नंतर सादर केलेल्या पंडित भीमसेन जोशी यांच्या काही अभंगांचा ’मिडले’ रसिकांची उत्स्फूर्त दाद घेऊन गेला. आपल्या वादनाची सांगता त्यांनी ‘इसराज’ या फारशा प्रचलित नसलेल्या वाद्यावर ‘मोगरा फुलला…’ व ‘तोच चंद्रमा नभात..’ ही दोन गीते सादर करून केली. मयूर जोशी यांनी त्यांना दमदार तबला साथ केली.

मानस यांचे वादन सुरू असतानाच मिलिंद मुळीक यांनी तीन फूट बाय तीन फूट आकाराच्या कॅनवासवर अॅक्रेलिक रंगांच्या सहाय्याने चित्र काढण्यास सुरुवात केली. रंगांचे कधी जोरदार तर कधी हळुवार फटकारे जसे कॅनवासवर उतरू लागले तसे त्या कोऱ्या कॅनवासवर त्रिमित भासातील चित्र आकार घेऊ लागले. मूर्त-अमूर्त अशा प्रकारातील ते चित्र साकारताना पाहणे ही रसिकांसाठी पर्वणी ठरली.

उत्तरार्धात निवेदक मिलिंद कुलकर्णी यांनी मिलिंद मुळीक यांची मुलाखत घेतली. यावेळी मुळीक म्हणाले “वर्षानुवर्षे चित्रकारितेचा सराव झाल्यावर आपोआप एक कौशल्य कलाकारात, त्याच्या बोटात येते. मग त्या सफाईने तो चित्रनिर्मिती करू लागतो. वाटा ठराविक होऊन जातात. चित्रात एकसुरीपणा येऊ लागतो. हा एकसुरीपणा मोडण्यासाठी मी जाणून बुजून प्रयत्न केला. जेव्हा मी संगीत सादरीकरण सुरू असताना चित्र काढतो, त्यावेळी माझे मन मुक्तपणे काम करू लागते. नेहमीच्या रुळलेल्या वाटा न घेता मी माझी अभिव्यक्ती कॅनवासच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवतो. त्यावेळी मनात काही ठरलेले नसते. त्यामुळे कधी मूर्त तर कधी अमूर्त शैली वापरली जाते.” त्यांनी त्यांच्या काही चित्रांमधून याचा खुलासा करीत निवेदन केल्याने एक तयारीचा चित्रकार काय प्रकारे विचार करतो याचे प्रात्यक्षिक रसिकांना पाहता आले.

मिलिंद कुलकर्णी यांनी यावेळी सतीश पाकणीकर यांनाही प्रश्न विचारून बोलते केले. चित्र- प्रकाशचित्र व संगीत अशी अनोखी मैफल या कार्यक्रमाद्वारे रसिकांनी अनुभविली.

Leave a Reply

%d bloggers like this: