जीवनात आनंद आणि स्थिरतेसाठी अध्यात्म गरजेचे- कुलगुरु प्रा.डॉ.नितीन करमळकर

पुणे: अध्यात्माची गरज वयाच्या साठीनंतर नाही. तर चांगले आयुष्य जगण्यासाठी लहानपणापासूनच अध्यात्माशी जोडून घेतले पाहिजे. स्थिरता, सहजता आणि आनंद मिळवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. अध्यात्माच्या जवळ जाण्यासाठी योगी होण्याची गरज नाही. चांगले जीवन जगण्यासाठी अध्यात्माकडे लवकरात लवकर वळायला हवे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.

श्रीमद राजचंद्र मिशन धरमपूर, पुणे अध्यात्म केंद्र यांच्या वतीने पूज्य गुरुदेव श्री राकेशजी लिखित ‘आत्मसिद्धी शास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील नवलमल फिरोदिया सभागृहात आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ फॅकल्टी आॅफ ह्युमॅनिटीच्या प्रमुख डॉ.अंजली कुरने, वाणिज्य शाखा आणि व्यवस्थापनाचे प्रमुख डॉ. पराग काळकर, इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष सुंदरवर दास, सूर्यदत्ता ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे संस्थापक डॉ.संजय चोरडिया आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तत्वज्ञान विभागाच्या सहयोगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी आॅनलाईन संवाद साधला. भरत मेहता आणि जिग्नेश फुरिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, आजच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक प्रलोभने आहेत त्यामध्ये सोशल मीडियामध्ये विद्यार्थी गुंतलेले आहेत. या प्रलोभन आतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी अध्यात्म आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. आत्मशुद्धी शास्त्र हे पुस्तक विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी एक आधार ठरू शकते. विद्यापीठांमधील तिन्ही अध्यासनांनी मिळून यावर वर्कशॉप करावे असे त्यांनी सांगितले.

डॉ.सदानंद मोरे म्हणाले, महात्मा गांधी यांनी राजकारणाला अध्यात्माची जोड दिली. गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे गुरू होते तर श्रीमद राजचंद्र हे त्यांचे आध्यात्मिक गुरू होते. राजकारणाचे अध्यात्मिकीकरण करायचे असे गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार होते. त्यांची ही इच्छा त्यांचे शिष्य महात्मा गांधी यांनी पूर्ण केली. त्यांना अध्यात्माचे अधिष्ठान श्रीमद राजचंद्र यांनी दिले.

आपल्या पारंपरिक तत्त्वज्ञानाच्या साहित्यामध्ये सिद्धी साहित्य असा एक भाग आहे. आत्मसिद्धी हा सगळ्यात श्रेष्ठ अनुभव असल्याचे यामध्ये सांगितले आहे. संपूर्ण भारतामध्ये आत्मसिद्धीची परंपरा ही श्रीमद राजचंद्र यांच्याकडून आली आहे आणि त्यांनी ती अतिशय उत्तम पद्धतीने आपल्याला सांगितली आहे.

काही लोक सद््गुरु  नसले तरी ते स्वत:ला सद््गुरु म्हणवून घेतात योग्य सद््गुरु जर आपल्याला भेटले तर ते आपल्याला योग्य मागार्ला नेऊन पोहोचवितात, हे परमार्थ मार्गाचे सत्य पुस्तकात सांगितले आहे. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत अध्यात्म या आत्मसिद्धी शास्त्र या पुस्तकात सांगितले आहे. कर्म आत्मा परमात्मा या सर्व गोष्टींचे अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितल्या आहेत.

विजय भटकर म्हणाले, अध्यात्म हे एक शास्त्र आणि सत्य आहे. आत्मसिद्धी शास्त्र या पुस्तकात अध्यात्माचे अतिशय चांगल्या पद्धतीने विवेचन केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: