मागील ५ वर्षाच्या विधी शाखेच्या प्रवेशप्रक्रियेबाबत अभाविपने विचारलेल्या प्रश्नांवर सी.ई.टी. आयुक्त निरुत्तर

पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने सी.ई.टी सेल आयुक्त रविंद्र जगताप यांना दि.१५ नोव्हेंबर रोजी निवेदन देऊन विधी शाखा विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर व प्रक्रियेमध्ये प्रत्येक वर्षी होणाऱ्या दिरंगाईबाबत तोडगा काढण्यासाठी आग्रही मागणी केली. परंतु यावेळी सी.ई.टी आयुक्त अभाविप शिष्टमंडळाला एकाही समस्यांचे उत्तर देऊ शकलेले नाहीत.

वर्ष २०१६ पासून विधी शाखेच्या प्रवेशासाठी राज्यात सुरू करण्यात आलेल्या सी.ई.टी. प्रवेश परीक्षेचा कायम गोंधळ राहिलेला आहे, प्रवेश प्रक्रिया कधीही वेळेवर पूर्ण झालेली नाही . यावर्षी देखील प्रवेश प्रक्रिया अधिकच त्रासदायक व वेळ काढू होत आहे. दि.२९ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या विधी शाखेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तब्बल १६ दिवस उलटून देखील विधी शाखेची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. अभाविपने माहित अधिकार अधिनियम – २००५ अंतगर्त मागवलेल्या माहिती नुसार हे समोर आले आहे कि, प्रवेश परीक्षा झाल्यानंतर शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश होईपर्यंत तब्बल ५ ते ६ महिने कालावधी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. अभाविपने राज्य शासन व सी.ई.टी सेलला आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून वारंवार हे निदर्शनास आणून दिले आहे. सी.ई.टी सेल च्या या गोंधळी कारभारामूळे विधी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संभ्रमावस्थेत आहेत. अभाविपने निवेदना द्वारे सी.ई.टी सेल आयुक्तांकडे केलेल्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत :-

१. प्रवेश प्रक्रिया १ महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्यात यावी.
२. सी.ई.टी सेल ने पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षेचे पूर्व नियोजन करून वेळापत्रक जाहीर करावे.
३. महाराष्ट्रातील शासकीय विद्यापीठांच्या केंद्रांवर सामाईक प्रवेश परीक्षांचे उपकेंद्र उभे करण्यात यावे.
४. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कार्यक्षम, अत्याधुनिक व अद्ययावत स्वरूपाचे विद्यार्थी मदत केंद्र उभे करावे.

Leave a Reply

%d bloggers like this: