जनजातीय समुदायाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करीत अभाविप करणार ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा

पुणे: महानायक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंडमधील लिहतु या गावी झाला. भारतीय इतिहासात भगवान बिरसा मुंडा यांना एक महानायक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी झारखंडमध्ये देशकार्य करुन जनजाती समुदायाची दिशा आणि दशा बदलून नवीन सामाजिक आणि राजनैतिक युगाचा आरंभ केला.

जमीनदारांकडून जनजाती समाजाचा होणारा छळ संपवण्यासाठी भगवान मुंडा यांनी प्रचंड प्रयत्न केले. बिरसा यांनी नैतिक आचरणाने शुद्धता, आत्म-सुधार आणि देशासाठी लढण्याचा उपदेश समाजाला दिला. त्यांनी ब्रिटिश सत्तेला नाकारले आणि आपल्या अनुयायींना सरकारला कर न देण्याचा आदेश दिला. दुष्काळादरम्यान बिरसा यांनी जनजाती समुदाय आणि अन्य लोकांसाठी कर माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

इंग्रजांकडून त्यांना अटक करण्यात आली आणि हजारीबाग येथील तुरुंगात त्यांना दोन वर्ष शिक्षा भोगावी लागली. पण, बिरसा मुंडा यांनी आपल्या गरिब जनतेच्या मदतीची आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शपथ घेतली होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या जीवन काळातच महापुरुष म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्यांना ‘भगवान’ व ‘धरती बाबा’ म्हणून संबोधलं जाऊ लागले. त्यांच्या प्रभावामुळे संपूर्ण क्षेत्रातील लोकांना देशाच्या स्वातंत्र्यात लढण्यासाठी प्रेरणा जागृत झाली. ९ जून १९०० साली तुरुंगात असताना त्यांचा मृत्यू झाला. भगवान बिरसा मुंडा केवळ २५ वर्षाचे जीवन जगले, पण त्यांनी आपल्या जीवनात जनजाती समुदायाला जागृत करण्याचं कार्य केलं आणि आज देखील देशभरातील विद्यार्थी, युवक व अभाविप त्यांना प्रेरणास्त्रोत मानून कार्य करत आहे.


दि. १० नोव्हेंबर ला केंद्रीय मंत्रीमंडळाने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती संपूर्ण देशभरात जनजाती गौरव दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णय घेतला. केंद्र शासनाच्या या निर्णयावर मत व्यक्त करतांना अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे म्हणाले कि, “जनजाती समुदायाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अतुलनीय आहे. शेकडो जनजाती क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपले योगदान दिले आहे. केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे जनजाती समुदायाने स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या कार्याचा गौरव आहे. जनजाती समुदायाचा इतिहास व संस्कृती नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. अभाविप केंद्र शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करते.”
भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्ताने दि. १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत अभाविप महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संपूर्ण प्रदेशात जनजाती गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रदेशातील नाशिक, अकोले येथे जनजाती गौरव यात्रा, व्याख्यानमाला, अभ्यास मंडळाच्या माध्यमातून जनजातीय समुदायाचा गौरवशाली इतिहास , संस्कृती , स्वातंत्र्य लढ्यातील Unsung Heroes त्यांचे कार्य समाजापर्यत पोहचविण्याचे कार्य केले जात आहे. पुणे येथे भगवान बिरसा मुंडा ग्रंथालय सुरू करून हजारो विद्यार्थी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करत आहेत तसेच महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजाती गौरव सप्ताह संपूर्ण प्रदेशात साजरा करून भगवान बिरसा मुंडा यांचे स्मरण अभाविप करणार आहे. अशी माहिती अभाविप चे महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री. सिद्धेश्वर लटपटे यांनी दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: