पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकित भाजपने पटकावल्या 14 जागा

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या 23 जागांसाठी निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने बंडखोरी करून आपला उमेदवार दिला होता. मात्र, काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपने 14 जागा पटकावल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 8 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शिवसेनेलाही यश आलं आहे. विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या गेटवर एकच जल्लोष केला.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पुणे महानगर नियोजन समितीच्या निवडणूकीमध्ये ग्रामीण क्षेत्रातील 7 जागांपैकी 2 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन उमेदवारांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये बाजी मारली आहे. त्यामध्ये प्रियांका पठारे आणि वसंत भसे हे निवडून आले आहेत. तर छोटे नागरी क्षेत्र म्हणजेच नगरपालिकामधून एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष भेगडे विजयी झाले आहेत.

पीएमआरडीएमध्ये शिवसेनेकडे पुण्यात 10 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 19 मते होती. तर भाजपकडे 172 मते होती. भाजपने या निवडणुकीत 14 उमेदवार दिले होते. त्यांचे हे सर्व उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडे 10 मते होती. त्यामुळे अतिरिक्त मतांचा कोटा भरून काढणे काँग्रेसला कठिण गेले. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रं आल्याने काँग्रेस या निवडणुकीत एकटे पडल्याचे चित्रं दिसत होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही 8 उमेदवार होते. त्यामुळे राष्ट्रवादीनेही या आठही जागा पटकावल्या आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, कॉंग्रेसने आपला उमेदवार उभा केल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोणाला धक्का बसणार याबाबत उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस उमेदवार या निवडणुकीत पराभव झाला असून या निकालाचे थेट परिणाम महापालिका निवडणुकीतील आघाडीवर होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: