‘मन मोरे गा झुम के’ मधून उलगडला आशाजींच्या सांगितीक जीवनाचा प्रवास

पुणेः बाबांना आठवून  गायलेले पहिले गाणे… त्यानंतर तासंतास हातात तंबोरा घेवून केलेला रीयाज… सुरूवातीच्या काळात केलेला खडतर प्रवास ते प्रेक्षकांच्या मनात मिळविलेले स्थान… भक्तीगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, लोकगीते ते पॉप अशा अनेक संगीतप्रकारांत गायन करीत संगीतक्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या अष्टपैलू गायिका आशाजी यांच्या सांगितीक जीवनाचा प्रवास उलगडला. आजच्या युवा पिढीला देखील आपल्या गाण्यांतून खिळवून ठेवणाऱ्या गीतांना पुणेकर रसिकांनी भरभरून दाद दिली.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित बियॉंड एंटरटेनमेंट ग्रुप, पुणे प्रस्तुत मन मोरे गा झुम के या सांगितीक कार्यक्रमातून आशा भोसले यांच्या संगीतमय जीवनप्रवास उलगडला. ज्येष्ठ सिनेअभ्यासक आणि लेखिका सुलभा तेरणीकर, वंदना कुलकर्णी आणि उस्मान शेख यांनी आशा भोसले यांच्या सांगितीक प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी आयोजक किशोर सरपोतदार, समन्वयक अजित कुमठेकर, प्रतिभा मोडक, विवेक परांजपे, सुधीर गाडगीळ, नीता मुढाळे, राजाभाऊ तिखे, अन्वर कुरेशी, मनीष गोखले, राजीव बर्वे परिवार, राजन लाखे, सतिश चपळगावकर, संदीप लचके, सतीश पाकणीकर, सरिता अनिरूध्द, समीरा जांगिरा, रूपाली मगर आदी मान्यवर उपस्थित होते. आशाजींच्या सांगीतिक कारकीर्दीचा आलेख यावेळी उलगडण्यात आला.

सुलभा तेरणीकर म्हणाल्या, सुरूवातीच्या काळात आशाजी मुंबई आकाशवाणीवर गेल्या तेव्हा त्यांना स्टेशन डायरेक्टरने विचारले कोण तुम्ही, तेव्हा त्या म्हणाल्या मी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांची मुलगी. मास्टर दिनानाथांची मुलगी म्हणजे तुम्हाला सर्व काही येतच असेल, असे जेव्हा ते म्हणाले तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. सुर, ताल काही माहिती नव्हते, क्वचित प्रसंगी त्या बाबांना तंबोऱ्यावर साथ करीत असत. फक्त बाबांचे अतिशय प्रभावी गाणे त्यांच्या कानावर पडलेले होते. तेव्हा त्यांनी मनात बाबांची आठवण काढली. जणू बाबांनीच सांगितले आणि मी गायला सुरूवात केली, अशी एक आठवण त्यांनी मला सांगितली. अशातच हुळूहळू गाण्याची संधी त्यांनी मिळू लागली, अशा हृद्य आठवणी सुलभा तेरणीकर यांनी प्रेक्षकांसमोर उलगडल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: