किल्ल्यातून साकारला शिवाजी महाराजांचा ‘प्रतापगडावरील पराक्रम’

पुणेः खानाच्या भेटीचा दिवस उजाडला… महाराजांनी आज रणयज्ञ मांडला होता, स्वराज्याची धगधगती आग उरी घेवून निघालेल्या महाराजांच्या रुपात आज अवतार घेतला होता तो तीक्ष्ण नखाग्रांच्या नरसिंहाने… आणि मग खानाला आलिंगन देताना खानाने महाराजांना ओढले त्यांची मान बगलेत दाबली अन कट्यारीने वार केला… महाराजांचा अंगरखा फाटला, कट्यार चिलखताला घासल्याने कर्रकर्र आवाज झाला… त्याच क्षणी महाराजांनी खानाच्या पोटात वाघनखे घुसवली अन खानाच्या पोटातील आतडी बाहेर काढली… खान पळाला… प्रतापगडावरील महाराजांच्या पराक्रमाचा हा इतिहास एकताना प्रेक्षकांच्या उंगावर रोमांच उभे राहिले.

लक्ष्मीनगर येथील सह्याद्री सेवा संघाच्यावतीने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यावेळी व्हिडीओ लाईट आणि साऊंड शोच्या माध्यमातून प्रतापगडावरील किल्ल्याचे वर्णन दाखविण्यात आले. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, रा.स्व. संघाचे विजय पानगावे यांच्या हस्ते किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका स्मिता वस्ते, विनोद वस्ते, सह्याद्री सेवा संघाचे अध्यक्ष रवी शिंदे आदी उपस्थित होते. महेश रांजणे यांनी किल्ल्याची प्रतिकृती साकारली. राजेश गोवंडे यांनी प्रतापगड किल्ला व त्याच्या इतिहासाची चित्रफीत तयार केली, प्रदिप सबनीस यांनी मार्गदर्शन केले.

स्मिता वस्ते म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचावा आणि पुढील पिढीतील प्रत्येकाला त्यांचा पराक्रम कळावा यासाठी सह्याद्री सेवा संघाच्यावतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा स्पर्धा राबविल्यामुळे मुले स्वतःहुन किल्ल्याची माहिती काढतात त्यामुळे त्यांनी इतिहास कळतो, असे ही त्यांनी सांगितले. शनिवार, दिनांक १३ नोव्हेंबर पर्यंत सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात किल्ल्याची प्रतिकृती नागरिकांना पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: