स्वर मैफलीने उजळली सोनेरी चंदेरी पहाट

पुणे : या जन्मावर या जगण्यावर… जीवनात ही घडी….  काटा रुते कुणाला… लाजून हसणे… शुक्रतारा मंद वारा… असा बेभान हा वारा… बगळ्यांची माळ फुले… माझे राणी माझे मोगा… गोमू संगतीने माझ्या तू येशील का… शूर आम्ही सरदार… मी डोलकर दर्याचा राजा… अशा अजरामर गीतांच्या स्वर मैफलीने सोमवारची पहाट उजळून निघाली. सोबतच अंजली पाडगावकर व अतुल अरुण दाते यांनी मंगेश पाडगावकर आणि अरुण दाते यांच्या आयुष्यातील रंजक किस्से सांगत आठवणींना उजाळा दिला.

निमित्त होते, ‘महक’ प्रस्तुत पंचतारांकित गंधर्वांच्या अजरामर गीतांच्या आणि किश्श्यांच्या दिवाळी पहाटचे! भावसंगीताचे किमयागार व सुवर्णकाळाचे शिल्पकार कवी मंगेश पाडगावकर, गायक अरुण दाते, कवयित्री शांता शेळके, संगीतकार श्रीनिवास खळे व यशवंत देव या पंचतारांकित गंधर्वांनी अजरामर केलेल्या गीतांची ‘सोनेरी चंदेरी’ मैफल कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रंगली. प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल यांच्या महक प्रस्तुत, माणिक एंटरटेनमेंट निर्मित ‘सोनेरी चंदेरी’चे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, किशोर सरपोतदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी यांच्या बहारदार गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. केदार परांजपे (सिंथेसायझर), प्रसन्न बाम (हार्मोनियम), निलेश देशपांडे (बासरी), अजय अत्रे (ऑक्टोपॅड), आदित्य आठल्ये (तबला), जीवन कुलकर्णी (ढोलक-ढोलकी) यांनी वाद्यांवर साथसंगत केली.

जय शारदे वागीश्वरी या सरस्वती वंदनाने ‘सोनेरी चंदेरी’ पहाट आरंभली. त्यानंतर आठवणी, किस्से आणि बहारदार गीतांचे सादरीकरण झाले. प्रत्येक गाण्याला उत्स्फूर्त दाद देत रसिकांनी ‘वन्स मोअर’ची फर्माईश केली. माझे जीवनगाणे, वादळ वारं सुटलो गो, भातुकलीच्या खेळामधली, सूर येति विरून जाती, स्वर आले दुरुनी अशी गीते झाली. शास्त्रीय, सुगमसंगीत गायनाने रसिकांना परमोच्च आनंद दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: