पुणे जिल्हा राज्य निवड अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत निशीत रहाणे याला दुहेरी मुकुट 

महिला गटात अनिशा शेवटेला, तर दुहेरीत निशित रहाणे व अर्जुन गोहड यांना विजेतेपद 

पुणे :  पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)यांच्या मान्यतेखाली  पुणे जिल्हा राज्य निवड अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुरुष गटात निशीत रहाणे याने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, महिला गटात एकेरीत अनिशा शेवटे हिने विजेतेपद पटकावले.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत पुरुष गटात अंतिम फेरीत चौथ्या मानांकित निशीत रहाणेने तिसऱ्या मानांकित अर्जुन गोहडचा 6-4 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. निशित हा बीएमसीसी महाविद्यालयात बारावी इयत्तेत शिकत असून सुनील कुसाळकर टेनिस अकादमीत प्रशिक्षक सुनील कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दुहेरीत अंतिम फेरीत निशीत रहाणेने अर्जुन गोहडच्या साथीत प्रथमेश शिंदे व आकाश खैरे या जोडीचा 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

महिला गटात अंतिम फेरीत अनिशा शेवटेने तन्वी तावडेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. अनिशा ही चिंचवड येथील एल्प्रो इंटरनॅशनल शाळेत शिकत असून मनोज कुसाळकर टेनिस अकादमीत प्रशिक्षक मनोज कुसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक प्रविण झिटे यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी: पुरुष गट:

निशीत रहाणे(4)वि.वि.अर्जुन गोहड(3)6-4;

दुहेरी गट: अंतिम फेरी:

निशीत रहाणे/अर्जुन गोहड(2) वि.वि.प्रथमेश शिंदे/आकाश खैरे 6-4;

महिला गट: अंतिम फेरी: 

अनिशा शेवटे वि.वि.तन्वी तावडे  6-4.

Leave a Reply

%d bloggers like this: