Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

पुण्याच्या औद्योगिक विकासात डॉ. भा.र.साबडे यांचा मोठा वाटा – डॉ. प्रमोद चौधरी

पुणे : नावीन्यता, संशोधन, दूरदृष्टिकोन असे गुण डॉ.भा.र.साबडे यांच्याकडे होते. देशाच्या औद्योगिकीरणात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून डॉ.साबडे यांनी छोटया व मोठया उद्योजकांमध्ये समतोल राखण्याचे काम केले. त्यामुळे पुण्याच्या औद्योगिक विकासात डॉ.भा.र.साबडे यांचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी केले.

ग्राहक पेठ व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यातर्फे सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबरच्या सभागृहात उद्योगविश्वातील दुवा असलेल्या व ग्राहक पेठेचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या डॉ.भा.र.साबडे यांच्यावरील ‘सन्मित्र भाऊ साबडे’ गौरवग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ.भा.र.साबडे यांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला. यावेळी सुनंदा साबडे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे महासंचालक प्रशांत गिरबने यांसह साबडे कुटुंबीय उपस्थित होते.

डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि डॉ.साबडे यांचे जवळचे नाते होते. सामाजिक दृष्टिकोनातून सुरू असलेल्या ग्राहक चळवळीत व ग्राहक पेठेत त्यांचा सहभाग होता. ते अनेक संस्था व संघटनांशी संबंधित असल्याने त्यातून त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व दिसून येते.

सूर्यकांत पाठक म्हणाले, डॉ.साबडे हे ग्राहक पेठेचे संस्थापक अध्यक्ष असून २० वर्षाहून अधिक काळ अध्यक्षपदी कार्यरत होते. तसेच तब्बल ४० वर्षे संचालक पदावर होते. साबडे यांचे कार्य तरुण पिढीसमोर यावे म्हणून हा ग्रंथ ग्राहक पेठेतर्फे प्रकाशित केला. डॉ.साबडे यांच्यासारखी आयुष्यभर कार्यरत असणारी माणसे आजही समाजात आहेत. सन १९६० ते ९५ या तब्बल ३५ वर्षांच्या काळात ते मराठा चेंबरशी निगडीत होते. देशातील औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांची मूठ बांधण्याचे काम त्यांनी केले. डॉ.साबडे व ग्राहक चळवळ ही वेगळे नाते आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून ते महाराष्ट्राचे उद्योगभूषण आहेत.

प्रशांत गिरबने म्हणाले, मराठा चेंबरमध्ये त्यांनी खूप मोठे काम केले आहे. मराठा चेंबूरचा शाखा, औद्योगिक क्षेत्र व सेवांचा विस्तार त्यांनी केला. सर्वोत्तम ज्ञानसंपदा असलेल्या डॉ.साबडे यांच्यासारख्या दिग्गजांनी मराठा चेंबरला मोठे केले, असेही त्यांनी सांगितले. डॉ. साबडे यांच्यावतीने त्यांची मुलगी सविता कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. साबडे यांचे सहकारी अरुण कुदळे व विवेक देशपांडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सुधीर पाचपोर यांनी गीतगायन केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading