11 वी CET प्रश्नपत्रिकेत इतर बोर्डाचे प्रश्नही समाविष्ट करा, उच्च न्यायालयाची सूचना
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 11वी प्रवेशासाठी CET घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र त्यासाठी आयसीई, सीबीएसई यासह अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ठेवलेला नाही. त्यामुळे इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मुद्द्यावर मुंबईतील विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्व विद्यार्थी एसएससी बोर्डातून उत्तीर्ण झालेले नाहीत. अर्थात सर्वांसाठी सीईटी परीक्षेत एकाच बोर्डाचा अभ्यासक्रम ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सीईटीसाठी वेगळा अभ्यासक्रम ठेवला जाऊ शकतो का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केला होता. तसेच आता उच्च न्यायालयाने अकरावी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत अन्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा विचार करावा आणि अशी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना राज्य सरकारला दिली आहे.
आयसीएसई बोर्डाच्या एका विद्यार्थिनीने वडिलांमार्फत याचिका करून सीईटीला आव्हान दिले होते. सीईटी ही एसएससी मंडळाच्या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणार आहे. त्यामुळे सीईटी केवळ एसएससी मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीच फायद्याची, तर अन्य मंडळाच्या नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरेल असे याचिकाकर्त्यांतर्फे सांगण्यात आले होते. त्यावर वेगळ्या अभ्यासक्रमाला परवानगी दिली जाणार नसेल, तर मग प्रवेशासाठी सीईटी परीक्षार्थींना प्राधान्य देण्याची अट मागे घेणार का, हे स्पष्ट करा, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली होती.
याविषयीची भूमिका २८ जुलै रोजी स्पष्ट करण्याचे निर्देशही दिले होते. त्यावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अकरावी सीईटीच्या प्रश्नपत्रिकेत अन्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांचे प्रश्न समाविष्ट करण्याचा विचार करा आणि अशी प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक समिती नेमा’, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे. यावर राज्य सरकारने हे शक्य नसल्याचे म्हटले आहे. मात्र न्यायालयाने ४ ऑगस्टला या मुद्द्यावर माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करण्यास राज्य सरकारला सांगितले असून सगळ्या मंडळांच्या अभ्यासक्रमांतील प्रश्नांचा समावेश असलेली प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी समिती नेमण्याबाबत विचार करा, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. तर अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी नोंदणी करण्याची मुदत २ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ही परीक्षा २१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
