Pune Crime : हत्येची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव जेरबंद

पुणे : पूर्ववैमनस्यातून हत्येची सुपारी देणारा  भाजपचा  माजी नगरसेवक विवेक यादव याला कोंढवा पोलिसांनी गुजरात, राजस्थान सीमेवर जेरबंद केले. भाजप माजी नगरसेवक विवेक यादव हा फरार झाल्यापासून पोलिस त्याच्या मागावर होते.

यापूर्वी कोंढवा पोलिसांनी राजन जॉन राजमणी आणि इब्राहिम ऊर्फ हुसेन याकुब शेख या दोघांना पिस्तुले बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांना बबलु गवळी याला मारण्यासाठी विवेक यादव याने सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले होते. त्यासाठी या दोघा गुन्हेगारांना यादव याने ३ पिस्तुले व ७ काडतुसे व रोख रक्कम दिली होती.

विवेक यादव हा भाजपचा पुणे कॅन्टोमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी आणि विवेक यादव यांच्यात पूर्वीपासून दुश्मनी आहे. यादव याच्यावर बबलु गवळी याने २०१६ मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात विसर्जन मिरवणुकीत गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते.

त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे जामिनावर बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर विवेक यादव फरारी झाला होता. त्याच्या तपासासाठी वेगवेगळी तीन पथके शोध घेत होती. तो गुजरात बॉर्डरवर असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी काल रात्री गुजरात आणि राजस्थान बाँर्डरवर त्याला पकडले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: