Tuesday, June 16, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

शाळा सुरू करायला हरकत नाही – डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाले आहे. परंतु मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. मात्र त्यांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे. सेरो सर्व्हेतून ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या भागांमधील शाळा सुरू करायला हरकत नाही. तसा विचार करून योजना बनवता येऊ शकते, असे मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे.

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची आणि त्यात मुले बाधित होण्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत डॉ. गुलेरिया यांनी केलेले हे वक्तव्य अतिशय महत्त्वाचे आहे. मुलांच्या शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत बोलताना डॉक्टर गुलेरिया म्हणाले की, आता मुलांच्या शाळा सुरू करण्याविषयी विचार करायला हवा. भारतीय मुलांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या ठिकाणच्या शाळा सुरू करायला हरकत नाही.

देशातील अनेक जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. अशा भागांमध्ये योग्य ती खबरदारी घेऊन आणि योजना आखून आपण शाळा सुरू करू शकतो. समजा तिथे कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढले तर शाळा तात्काळ बंद करता येऊ शकतात. सुरुवातीला एक आड एक दिवस आणि त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय शाळांबाबत घेता येऊ शकतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेतील शिक्षण खूप महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन शिक्षणाऐवजी मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण घेणे हे जास्त महत्त्वाचे आहे. देशातील खूपच कमी मुलांना कोरोनाची लागण झाली होती. यातील अनेक मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे ती बरी झाले होती. सेरो सर्व्हेतही प्रौढांच्या तुलनेत मुलांमध्ये जास्त अँटीबॉडीज असल्याचे उघड झाले आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही, असे त्यांनी सांगितले. शाळेत प्रत्यक्ष जाऊन जेवढे चांगले शिक्षण मिळते तेवढे ऑनलाइन किंवा इंटरनेटमधून मिळत नाही. गेल्यावर्षी नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान १० वी आणि १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे हे पुन्हा बंद झाले होते. मात्र आता शाळा सुरू करण्यास हरकत नसल्याचे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading