उत्तर प्रदेशात BSP चे 23 जुलै रोजी ब्राह्मण संमेलन
लखनौ : उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा ब्राम्हण समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग त्म्हणून बसपाच्या वतीने अयोध्येत येत्या 23 जुलै रोजी ब्राम्हण संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
याविषयी बोलताना मायावती म्हणाल्या की ब्राम्हण समाजाने गेल्या वेळी भारतीय जनता पक्षाला मतदान केले पण त्यांचा भ्रमनिरास झाला असून आता हा समाज पुन्हा बहुजन समाज पक्षाकडे वळणार आहे. ब्राम्हण समाजाचे हित बहुजन समाज पक्षच सांभाळू शकतो हे या समाजाच्या लक्षात आले आहे.
कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांनी ब्राम्हण समाजाला फसवण्याचेच काम केले आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. हे या समाजाला पटवून देण्यासाठी आणि या समाजाशी पक्षाची नाळ पुन्हा जोडण्यासाठी बहुजन समाज पक्षाने पुन्हा प्रयत्न हाती घेतले आहेत.
