बनसोडे भावंडांच्या उपक्रमाला ‘वन लेस’ची साथ

सातारा : निसर्गाचे चक्र नीट चालण्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून सातारा जिल्ह्यातील गोंदवले खुर्द गावातील रोहित आणि रक्षिता बनसोडे या बहीण-भावाने माळरानावर वृक्षारोपण करत निसर्ग संवर्धनाचा उपक्रम हाती घेतला आहे. बनसोडे भावंडांच्या या उपक्रमाला आता पुण्यातील वन लेस आणि मुकुल माधव फाऊंडेशनची साथ लाभली आहे.

माणदेशातील गोंदवले येथे राहणाऱ्या रोहित आणि रक्षिता बनसोडे पर्यावरण संवर्धना, नापीक जमीन, जलस्रोत पुनर्जीवित करण्यासाठी काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत गोंदवले खुर्द या गावी ५००० झाडांची लागवड केली आहे. या भावंडांच्या उपक्रमाची दखल घेत ‘वन लेस’च्या संस्थापिका हंसिका छाब्रिया यांनी पुढाकार घेत या उपक्रमासाठी त्यांनी १००० झाडांसाठी निधी आणि या वृक्षारोपण कामासाठी जेसीबीची मदत पुरविण्यात आली.

वृक्षारोपण करण्यासह विहिरी आणि छोटे तळेही खोदले आहेत. जंगली प्राण्यांना पिण्यासाठी आणि वृक्षारोपणासाठी या पाण्याचा उपयोग होतो आहे. त्यांनी पाणी संवर्धनासाठी आणि पाझरण्यासाठी सीसीटी (कन्टीन्युयस काउंटर ट्रेंचेस) खोदले आहेत, ‘सीसीटी’मुळे मृदा संवर्धन होते, पावसाच्या पाण्याने माती वाहून जात नाही, पाझर वाढवते, भूजलपातळीमध्ये वाढ, हरित क्षेत्रात वाढ, मातीची गुणवत्ता वाढवते, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शेतीचा विकास आणि रोजगार यासारखे फायदे होतात.

“आमच्या वडिलांकडे एक गुंठाही स्वतःची शेतजमीन नाही आहे. झाडे लावण्याचा हा उपक्रम तालुक्यातील वनविभागाच्या जमिनीवर सुरू आहे. आम्ही वेळ काढून मोठ्या कष्टाने ही झाडे लावली, जगवली आहेत. कोरोनाच्या काळात झाडांचे महत्व जगाला समजले आहे. त्यामुळे सर्वांनी विशेषतः तरुण-तरुणींनी वृक्षलागवडीच्या कामात झोकून देऊन काम केले पाहिजे. एकाने किमान एक झाड लावून किमान दोन वर्षे ते जगवले पाहिजे,” असे रक्षिता आणि रोहित म्हणाले.

“रोहित आणि रक्षिता यांचे काम कौतुकास्पद आहे. निसर्ग संवर्धनाचे कार्य मोलाचे आहे. अशा कार्याला आम्ही नेहमीच पाठिंबा देतो. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आणि वाढते शहरीकरण यामुळे नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. याचा सामना करण्यासाठी वन लेस वृक्षारोपण व अन्य पर्यावरण संवर्धनाचे काम करत आहे. कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी, तसेच वनीकरण वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.” – हंसिका छाब्रिया, संस्थापक, वन लेस

Leave a Reply

%d bloggers like this: