राज्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस; 11, 12 आणि 13 जुलै रोजी पुण्यात ऑरेंज अलर्ट

पुणे : मागील काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट  जारी केला आहे. आज पुण्यासह राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यात नंदुरबार, भांडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे चार जिल्हे वगळता, सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.


दरम्यान वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. राज्यात आज ताशी 30 ते 40 किमी प्रतितास इतक्या वेगानं वारा वाहणार आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभं न राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


भारतीय हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पुण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या पुण्यात मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पण 11, 12 आणि 13 जुलै या तीन दिवशी पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे 11 जुलैपासून पुढील तीन दिवस पुण्यात मेघगर्जनेसह
वेगवान वाऱ्याच्या साथीनं मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना लांबचा प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: