एड्स व पर्यावरण जनजागृती साठी आळंदी – पंढरपूर सायकल संवाद यात्रा; डॉ पवन चांडक व वासलवार करणार सायकल प्रवास
परभणी : सध्या कोविद मुळे मागील दीड वर्षात अनेक समविचारी मित्र, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी, पर्यावरण प्रेमी अशांच्या भेटी कठीण झाल्या आहेत. परंतु आता हळूहळू कोविद चा प्रादुर्भाव कमी होत आहे शिवाय आता सर्वसामान्य पणे सगळीकडे जनजीवन पूर्ववत होत आहे. अशा वेळी मागील दीड वर्षात आपण सर्वांनीच अत्यंत कठीण परिस्थिती अर्थात कोरोना प्रादुर्भाव मुळे आरोग्यास जपणे, ज्यांना प्रादुर्भाव झाला त्यांची काळजी आणि यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकट यातून सावरत असतांना समहविचारी मित्रांशी संवाद गरजेचा झाला आहे. तो केवळ Virtual नव्हे तर कोरोनाचे नियम पाळून संवाद झाला तर एक प्रकारे मानसिक ताण, नैराश्य, भीती दूर होऊन सर्वच क्षेत्रातील मित्र पुन्हा एकदा तितक्याच जोमाने आपापल्या क्षेत्रात नैपुण्य गाजवतील.
म्हणून पुन्हा एकदा परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएएआरसी) संस्थेतर्फे दि 11 जुलै पासून पुणे आळंदी पंढरपूर व परत परभणी अशा संवाद सायकल वारीचे आयोजन करण्यात येत आहे. एचएएआरसी संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक यांच्या सोबत राजेश्वर वासलवार हे या सायकल मोहिमेत सहभागी होणार आहेत.
प्रबोधनात्मक सायकलवारी:
ही 8 वी सायकल वारी असून दरवर्षी प्रमाणे एचआयव्ही संक्रमित अनाथ बालकांचे मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन तसेच एड्स विषयी जनजागृती, वाढत्या इंधन दरवाढीसाठी सायकल टू वर्क चा वापर अर्थात दैनंदिन कामासाठी सायकलचा वापर करणे ज्यामुळे पेट्रोल ची बचत होईल, तसेच सायकलिंग मुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाची जपवणुक होईल, तसेच नियमितपणे सायकलिंग मुळे प्रतिकारशक्ती वाढते हे देखील संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सायकलिंग नियमितपणे करणे आवश्यक आहे.
लोकसंख्या दिन निमित्त जनजागृती: 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन असल्यामुळे कुटुंब नियोजनावर भर देऊन आणि कुटुंब नियोजनात पुरुष नसंबंदी शस्त्रक्रिया ला प्राधान्य देणे गरजेचे आहे. डॉ पवन चांडक यांनी स्वतः 4 वर्षा पूर्वी ही शस्त्रक्रिया केली होती तेंव्हा पासून ते स्वतः या विषयी जनजागृती करत आहेत.
सामाजिक बांधिलकी: पेडल फॉर SHE अंतर्गत या सायकल वारी दरम्यान जितके अंतर कापले जाईन त्यानुसार मोहीम पूर्ण झाल्यावर परभणी जिल्ह्यातील वंचित किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात येणार आहे.
डॉ पवन चांडक यांचा 72000 किमी सायकलिंग चा टप्पा पूर्ण: या पूर्वी 2013 पासून ते 2021 दरम्यान एचआयव्ही एड्स जनजागृती सोबत एचआयव्ही संक्रमित बालकांच्या मूलभूत प्रश्न जसे शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन विषयी सर्वसामान्यांमध्ये सायकलिंग मोहिमेतून संवाद साधून आजवर 72,000 पेक्षा जास्त किमी सायकलिंग भारतातील 7 राज्य आणि परदेशात इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, फ्रांस आदी भागात आजवर केलेल्या निर्धारित वेळेत केली आहे। सध्या एचएआरसी संस्थे तर्फे परभणी जिल्ह्यातील 330 एचआयव्ही संक्रमित अनाथ, एक पालक व दुर्धर आजारग्रस्त बालकांच्या मूलभूत प्रश्नावर कार्य सुरू आहे। तसेच महाराष्ट्रातील एड्स ग्रस्त मुलांसाठी असलेल्या विशेष बालगृह जसे सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर, इंफॅन्ट इंडिया बीड, पालवी पंढरपूर व सूर्योदय बालगृह अकोला येथील मुलांना वेळोवेळी मदत दिली जाते. एचएआरसी संस्था शासकीय मदत न घेता मागील 12 वर्षा पासून केवळ लोकसहभागातून मिळणाऱ्या मदतीवर कार्य करते.
वारीचा मार्ग: 11 जुलै रोजी पुणे रेल्वे स्टेशन हुन सायकल वारीची सुरवात होईल तिथे आनंदवन मित्र मंडळ मधील कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आळंदी येथे ज्ञानेश्वर माऊली समाधी मंदिर चे शिखर दर्शन घेऊन आळंदी येथील पर्यावरण प्रेमी मित्रांना भेटून हडपसर मार्गे सोलापूर हायवेला लागेल. वाटेत उरुळी कांचन, चौफुला मार्गे पाटस येथील सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेऊन कुरकुंभ मार्गे भिगवण येथे मुक्काम करतील। भिगवण येथे भिगवण सायकलिंग क्लब आयोजित कार्यक्रमात संवाद साधतील.
12 जुलै रोजी भिगवण हुन निघून इंदापूर येथे सामाजिक कार्यकर्ते कैलास कदम, इंदापूर प्रेस क्लब व इंदापूर सायकलिंग ग्रुप सदस्यांशी संवाद साधून अकलूज मार्गे वेळापूर पोहोचतील. वेळापूर येथील पत्रकार संघ व सामाजिक कार्यकर्ते यांची भेट घेऊन पंढरपूर येथे पालवी एड्स प्रकल्प येथे मुक्काम करणार आहेत. पालवी एड्स प्रकल्पातील अनाथ मुलांशी संवाद साधून 13 जुलै रोजी
नामदेव पायरी येथे कळस दर्शन घेऊन सोलापूर, तुळजापूर उस्मानाबाद मार्गे परभणीकडे परतीच्या प्रवासास निघतील.
या सायकल मोहिमेत डॉ पवन चांडक यांच्या सोबत राजेश्वर वासलवार हे सहभागी होत आहेत.
