डॉलर नरमल्याने सोन्याचे दर वाढले

मुंबई : पुढील महिन्यात ओपेकच्या उत्पादनासंबंधी अस्पष्ट भूमिकेमुळे बाजारातील पुरवठ्यावर ताण येण्याच्या अंदाजामुळे तेलात नफा दिसून आला तर डॉलरचे मूल्य कमी झाल्याने सोन्याला आधार मिळाला असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

सोने: सोमवारी, स्पॉट गोल्डचे दर ०.३ टक्क्यांनी वाढले आणि १७९१.६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. अमेरिकी डॉलर आणि बाँड उत्पन्नात घट झाल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याचे आकर्षण वाढले. मागील आठवड्यात अमेरिकन रोजगार आकडेवारीनुसार, अमेरिकी कामगार बाजारातील प्रगतीविषयी फारशी स्पष्टता दिसली नाही. परिणामी निरंतर नफ्यात राहिलेला डॉलर मागे पडला. अमेरिकी कंपन्यांच्या नोकऱ्यांत वाढ दिसून आली तर बेरोजगारीचा दरही वाढलेला दिसून आला. तसेच तासानुसार उत्पन्नात अपेक्षेपेक्षा कमी गती दिसून आली.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बुधवारी होणाऱ्या नव्या धोरण बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. कारण येत्या काही महिन्यांत मध्यवर्ती बँकेच्या चलनविषयक भूमिका यातून स्पष्ट होईल. कोव्हिड-19 च्या डेल्टा व्हेरिएंटच्या व्यापक प्रसारामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. त्यामुळे पिवळ्या धातूला काहीसा आधार मिळाला. आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील संक्रमितांची संख्या वाढल्याने लॉकडाऊनही वाढवण्यात आले. परिणामी बाजार भावनांवर नकारात्मक परिणाम झाला.

कच्चे तेल: आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी, ब्रेंट डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.४ टक्क्यांनी वाढले आणि ७९.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. सध्या सुरु असलेल्या बैठकीत ठोस करार करण्यात ओपेक अपयशी ठरले. यूएईने पुढील काही महिन्यात उत्पादन कपात कमी करणे आणि उत्पादन वाढवण्याच्या भूमिकेस आक्षेप घेतल्याने तेल निर्यात समूहाने या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नाही.

ओपेक आणि सदस्यांकडून अतिरिक्त तेल पुरवठा होणार नसल्याच्या चर्चांमुळे तेलाच्या दरांना आधार मिळाला. २०२० मध्ये लादलेली उत्पादन कपात अनावश्यक होती आणि जागतिक मागणीत सुधारणाही होत असल्याने तेलाला नफा होऊ शकतो. तथापि, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या प्रसारात वाढ झाल्याने निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. या निर्बंधांच्या चिंतेमुळे क्रूडमधील नफ्यावर मर्यादा आल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: