Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

सीए दिवसानिमित्त तळजाई टेकडीवर वृक्षारोपण

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पुणे शाखा, विद्यार्थी शाखा ‘विकासा’ यांच्या वतीने सीएसआर कमिटीच्या उपक्रमांतर्गत सीए दिवसानिमित्त तळजाई टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा नगरसेविका अश्विनी कदम यांच्या हस्ते हे वृक्षारोपण झाले. १०० देशी झाडे तळजाई टेकडीवर लावण्यात आली, तर उर्वरित २५० झाडे रक्तदात्यांना व आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित लोकांना देण्यात आली.

आयसीएआयच्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमावेळी आयसीएआयच्या पुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशीनाथ पठारे, ‘विकासा’चे उपाध्यक्ष अथर्व खुर्द, सदस्य प्राची शर्मा, अभिजित कडलाग आदी उपस्थित होते. सकाळी बिबवेवाडी येथील आयसीएआय भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. प्रसंगी सीए चंद्रशेखर चितळे यांनी ‘आयसीएआय’च्या उपक्रमांविषयी माहिती दिली. कात्रज येथील जनसेवा फाउंडेशनच्या अनाथाश्रमात शालेय साहित्य वाटण्यात आले.

अश्विनी कदम म्हणाल्या, “कोरोनाच्या काळात शुद्ध हवेचे महत्व आपल्या सगळ्यांना समजले आहे. त्यामुळे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे. तळजाई, हनुमान टेकडीसारखी निसर्गरम्य ठिकाणे व्हायला हवी. केवळ वृक्षारोपण करून थांबू नये, तर त्या झाडांचे संवर्धन करणेही तितकेच महत्वाचे आहे. आज सीए दिवसाच्या निमित्ताने आपण सनदी लेखापालांनी घेतलेला हा उपक्रम अतिशय समर्पक आहे.”

पुणे शाखेच्या उपक्रमांविषयी सीए समीर लड्डा यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना म्हणाले, “सीए दिवसानिमित्त दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. मात्र कोरोनामुळे यंदाही मर्यादित स्वरूपात हा उपक्रम होत आहे. भवतालचा परिसर हिरवागार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. यासह रक्तदान, अन्नदान, शालेय साहित्य वाटप असे अन्य उपक्रम आजच्या दिवशी घेतले आहेत.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading