लॉटरी स्टॉल उघडण्यास मुभा देण्याच्या निर्णयामुळे लॉटरी व्यावसायिकांना दिलासा
पुणे:कोरोनाच्या संसर्गाचा राज्य तसेच परराज्यातील लॉटरी व्यवसायावर परिणाम झाला आहे. गेले दोन महिने राज्यभरातील लॉटरी स्टॉल बंद होते. सणासुदीच्या काळात व्यवसाय बंद असल्याने राज्य लॉटरीची उलाढाल ठप्प झाली होती. राज्यभरातील लॉटरी स्टॉल उघडण्यास मुभा देण्याच्या निर्णयामुळे लॉटरी व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून लॉटरीप्रेमी तसेच शौकिनांकडून तिकिटे खरेदी करण्याचे प्रमाण येत्या काही दिवसांत वाढेल, अशी आशा लॉटरी विक्रेते व्यक्त करत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला. त्या वेळी १८ मार्चपासून लॉटरी तिकिटांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. दोन ते अडीच महिन्यानंतर पुन्हा लॉटरी विक्रीस परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. आठवड्यापूर्वी लॉटरी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आल्याने लॉटरी विक्री व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीचे दरमहा महाराष्ट्र गौरव व गणेशलक्ष्मी हे दोन मोठे ‘ड्रॉ’ असतात. निर्बंध शिथिल झाल्यानंतर एप्रिलमध्ये रद्द झालेल्या ‘ड्रॉ’ च्या तिकिटांची विक्री करण्यास पनवेल येथील शासकीय लॉटरी कोषागाराकडून परवानगी देण्यात आली आहे. जुनीच तिकिटे विकण्यास परवानगी देण्यात आली असून 11 जुलै नंतर प्रमुख ‘ड्रॉ’ चे निकाल लागणार आहेत, असे मॅजेस्टिक लॉटरी स्टॉलचे राहुल कोठावळे यांनी सांगितले. गेल्या वर्षी गणेशोत्सवात लॉटरी तिकिटांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती. लॉटरी व्यवसाय सुरळीत होण्यास आणखी एक महिन्याचा कालावधी लागेल, असे त्यांनी सांगितले.
