अभिजात संगीताचा दुर्मिळ ठेवा स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानकडे सुपूर्त
पुणे : स्वरराज छोटा गंधर्व यांच्या गायकीवर नितांत प्रेम करणार्या एका रसिकाने छोटा गंवर्ध यांच्यासह अलौकिक प्रतिभासंपन्न अशा गायकांच्या जवळपास 48 रेकॉर्डस् संगीत रंगभूमीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत् कार्य करणार्या स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
या संगीत रसिकाचे नाव आहे दशरथ वाणी. खासगी क्षेत्रात नोकरी करता करता दुर्मिळ वस्तू जमविण्याचा छंदही त्यांनी जोपासला. संगीत नाटकांची त्यांना प्रचंड आवड. नाट्यसंगीताची आवड बघून एका मित्राकडून त्यांना रेडिओग्राम आणि काही रेकॉर्डस् मिळाल्या. अनेक वर्षे जतन केलेला हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने वाणी यांनी स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या हाती ठेवा मोठ्या विश्वासाने सुपूर्त केला आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मेधा कुलकर्णी यांच्या माध्यमातून प्रतिष्ठानकडे या रेकॉर्डस् देण्यात आल्या. स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि वाणी यांची थेट ओळख नाही. पण गेल्या काही दिवसांपासून वाणी हे त्यांच्याकडील रेकॉर्डस् कुणाकडे द्याव्यात या विवंचनेत होते. काही संस्थांशी त्यांनी थेट संपर्कही साधला पण सूर काही जुळले नाहीत. मेधा कुलकर्णी यांचे पती विश्राम कुलकर्णी आणि वाणी यांची अचानक भेट झाली. या भेटीत वाणी यांनी त्यांच्याकडील रेकॉर्डस् चांगल्या संस्थेकडे द्यायच्या असल्याचे सांगितले. त्यातूनच वाणी यांनी मेधा कुलकर्णी यांची भेट होऊन या विषयी सविस्तर माहिती दिली. त्या वेळी कुलकर्णी यांनी स्वरराज छोटा गंवर्ध प्रतिष्ठान, पुणेचे नाव वाणी यांना सुचविले.
ज्येष्ठ गायक अभिनेत्री मधुवंत दांडेकर, मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वाणी यांनी हा 48 रेकॉर्डस् चा अमूल्य ठेवा स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या अध्यक्षा चारुशीला केळकर, उपाध्यक्षा सुचेता अवचट यांच्या हाती एका छोटेखानी घरगुती संमारंभात सोपविला.
दशरथ वाणी म्हणाले, स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानचे कार्य पाहून योग्य हातात हा ठेवा दिल्याचे समाधान आहे. 1960-70 या दशकातील या रेकॉर्डस् असून छोटा गंधर्व यांच्यासह हिराबाई बडोदेकर, पंडित राम मराठे, पंडित जितेंद्र अभिषेकी आदींच्या रेकॉर्डस् यात आहेत. गाण्याची आवड असेल, गायकांविषयी आदर असेल अशांकडे हा ठेवा सोपविण्याची इच्छा होती. ती मेधा कुलकर्णी यांच्यामुळे पूर्ण झाली याचे समाधान आहे.
