लवकरच 12 ते 18 वयोगटातील मुलांना झायडस कॅडिलाची लस
नवी दिल्ली : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात 12 ते 18 वयोगटातील मुलांना झायडस कॅडिलाची लस देण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रकात दिली आहे. झायडस कॅडिलाची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित लस आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली असून ती आता मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे.
सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारणे म्हंटले आहे की, भारतातील 18 वर्षांवरील लोकसंख्या ही अंदाजे 93 ते 94 कोटी इतकी आहे. त्यामुळे त्याच्या लसीकरणासाठी 188 कोटी डोस लागतील असा अंदाज आहे. जानेवारी 2021 पासून सुरु झालेल्या लसीकरणासाठी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसी वापरण्यात येत आहेत.
दरम्यान, झायडस कॅडिला कंपनीकडून त्याच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती करण्यात आली आहे. या लसीच्या वापराला परवानगी मिळाल्यास ती देशातील चौथी तर स्वदेशी प्रकारातील दुसरी लस असणार आहे. झायडस कॅडिलाची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
