स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेची सिटी लायब्ररी उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीची मान्यता
पुणे : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेची सिटी लायब्ररी उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी सहा कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदेलाही मान्यता दिली आहे. घोले रस्त्यावर सुमारे २२०० चौरस मीटरची महापालिकेची महर्षी मामाराव दाते मुद्रणालयाची इमारत आहे. ही इमारत खूप जुनी झाल्याने या ठिकाणी नवीन इमारत बांधून सिटी लायब्ररी निर्माण केली जाईल.
पुण्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत. त्यामध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बॅंकिंग परीक्षा यांसह इतर अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना संदर्भ साहित्याची गरज असते. हे साहित्य पारंपरिक तसेच डिजिटल ग्रंथालयाच्या स्वरूपात या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज वर्ग खोल्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एका वेळी एक हजार विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यासाठी नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे या पाठपुरावा करत आहेत, अशी माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
