Thursday, September 3, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आंबिल ओढा परिसरातील अतिक्रमण कारवाईला स्थगिती

मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील अतिक्रमण कारवाईला आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती देण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले. याबाबत उपमुख्यमंत्री व  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन हे निर्देश दिल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान, या अतिक्रमण कारवाईला न्यायालयाने ही 7 जुलै पर्यंत स्थगिती दिली आहे.

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महानगर पालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे आज सकाळी तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्या विशेष प्रयत्नाने आज  व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पदुम मंत्री सुनील केदार, झोपु प्राधिकरणाचे  मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निंबाळकर, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

आंबिल ओढ्यातील रहिवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे ती तात्काळ थांबवावी. तसेच ऐन पावसाळ्यात  त्यांना बेघर करु नये, त्यासाठी  पर्यायी व्यवस्था करुन बाधितांना कायमची घरे देण्यात यावी, अशा सूचना डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. त्यावर राज्य शासन सर्वांना घरे देण्याबाबत सकारात्मक आहे. लोकांना न्याय द्यायचा आहे, कुणालाही बेघर करणार नाही हीच शासनाची भूमिका आहे. सद्यस्थिती ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांचे पुनर्वसन केले जात असून येत्या काळात त्यांना हक्काची घरे देण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी दिली.

आज आंबिल ओढ्यातील अतिक्रमण कारवाई झालेल्या रहिवाशांचे स्थलांतर राजेंद्र नगरमध्ये केले जात आहे. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईबाबत यापूर्वी रहिवाशांना सूचना देण्यात आल्या होत्या. तात्पुरत्या स्वरुपात सर्वांचे स्थलांतरीत करण्याची कारवाई सुरु आहे. कोणालाही बेधर करणार नाही, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी मशाल सर्व्हे व झोपु प्राधिकरणाच्या यादीनुसार पात्र कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पा विषयी पाच जणांची समिती ही नेमन्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading