Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

‘आयसीएआय’तर्फे ७०० जणांचे लसीकरण


पुणे : दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वतीने आयोजित लसीकरण मोहीमेत १८ ते ४४ या वयोगटातील ६०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सीए सभासद, त्यांचे कुटुंबिय आणि सीए फार्ममधील कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी दत्तवाडी येथील ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. 

बुधवारी या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. २०० लोकांचे लसीकरण यावेळी झाले. तत्पूर्वी, राव नर्सिंग हॉस्पिटलच्या सहकार्याने ४५ वर्षांवरील १०० ज्येष्ठ सीए सभासदांचे लसीकरण करण्यात आले होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या लसीकरण मोहिमेवेळी विभागीय समितीचे सदस्य सीए यशवंत कासार, ‘आयसीएआय’च्यापुणे शाखेचे अध्यक्ष व खजिनदार सीए समीर लड्डा, उपाध्यक्ष व सचिव सीए काशिनाथ पठारे, माजी अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथील डॉ. कौस्तुभ शेंडकर आदी उपस्थित होते.  

यावेळी बोलताना सीए समीर लड्डा म्हणाले, “सीए सभासद, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेने ‘स्पेशल कोविड-१९ टास्क फोर्स’ची स्थापना केली आहे. तसेच लसीकरण मोहीम, रक्तदान, प्लाज्मादान शिबिर आयोजन, क्वारंटाईन किंवा रुग्णालयात असलेल्या सीएच्या पाल्यांसाठी निवास-भोजन व्यवस्था, आवश्यक ती वैद्यकीय मदत, रुग्णालयात दाखल करण्याबाबत लागणारे सहकार्य, औषधे, विलगीकरण कक्षाची उभारणी आदींमध्ये हे टास्क फोर्स काम करत आहे. कोविड-१९ विषयी जागृतीपर व्याख्याने ऑनलाईन आयोजिली जात आहेत. पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अजित कुलकर्णी, ऑन्कोपॅथोलॉजी तज्ज्ञ डॉ. दीपक लड्ढा यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच पुणे शाखेतील सभासद, ‘विकासा’चे विद्यार्थी सभासद व कर्मचाऱ्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading