Thursday, September 3, 2026
ENTERTAINMENTLatest News

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार, सा रे ग म प लिटील चॅम्प्स

झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. सारेगमपचा हा प्रतिष्ठित मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.
‘सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे ‘कमलेश भडकमकर’ आणि त्यांचा वादक मित्रांची. निलेश परब यांची ढोलकी, अमर ओक यांची बासरी, अर्चिस लेलेंचा तबला, सत्यजित प्रभू यांचा सिंथेसायजर, या मंडळींनी ही वाद्य वाजवायला घेतली की कानसेनांच्या कान तृप्त व्हायचे, जणू ही वाद्य आपल्याशी बोलत आहेत असे वाटे.
या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच  रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली.
आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास १२ वर्षांनी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स” पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरात सुरु झाली. यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत, हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहे.
ह्या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही, छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की, सा रे ग म प लिटिल चॅम्प्स हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading