कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे दि. 12 : राज्यातून बालकामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने समाजाच्या विविध घटकांमध्ये या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयामार्फ़त जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त कामगार उपायुक्त कार्यालयाच्या जनजागृतीपर चित्ररथाचा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी पुणे विभागाचे कामगार आयुक्त शैलेश पोळ, कामगार उपायुक्त अभय गिते, सहायक कामगार आयुक्त निखील वाळके, मु.अ.मुजावर, विशाल घोडके, सरकारी कामगार अधिकारी दत्तात्रय पवार, श्रीमती अत्तार उपस्थितीत होते.
जागतिक बालमजुरी विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर चित्ररथ पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात फ़िरवून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच विविध आस्थापना मालक, औद्योगिक आस्थापनांचे प्रतिनिधी, हॉटेल असोसिएशनचे प्रतिनिधी, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्सचे प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी यांची झूम मिटींग आयोजित करून बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधि. १९८६ यांच्या तरतूदी विषयी माहिती देण्यात आली. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर बालकामगार प्रथेविरूद्ध जास्तीत जास्त डिजिटल माध्यमातून प्रसार व जनजागृती करण्यावर भर देण्यात येत असल्याचे कामगार आयुक्त शैलेश पोळ यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: