Crime – आधी केली कोविड चाचणी नंतर गळा चिरुन केला वडिलांचा खून

पुणे – आजारी वडिलांची कोविड चाचणी  केल्यावर त्यांचा ब्लेडने गळा चिरुन एका मद्यपी मुलाने खून केला. ही घटना लोणी काळभोर परिसरात घडली. या मद्यपी मुलाने घरातील सदस्यांना दोन दिवस बेडरुममध्ये कोंडून ठेवत बाहेर काहीही  न सांगण्याबाबत धमकी दिली होती. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी असतानाच खूनी मुलाला पोलिसांनी बेड्या घातल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, लोणी काळभोर येथे मेकॅनिकचे काम करणाऱ्या व्यक्तीचे वडिल मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्याने त्यांची सात जूनला करोना चाचणी केली. यानंतर आठ तारखेला “मै तुम्हे बिमारीसे आझाद कर दुंगा’ असे म्हणत पहिला गळा दाबला. यानंतर गळ्यावर ब्लेडने सपासप वार करुन खून केला. खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह तब्बल दोन दिवस घरातच ठेवला होता. घरातील बहिण व दोन भाच्यांना त्याने बेडरुममध्ये डांबून ठेवले. त्यांना कोणालाही याची खबर न देण्याची तंबी दिली होती.

दरम्यान, त्याच्या पासून विभक्त रहात असलेली पत्नी आज घरी आली होती. तीने ही घटना पाहिल्यावर तीला धक्का बसला. तीने तातडीने पोलिसांना याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. यानंतर मद्यपी मुलाला ताब्यात घेतले. यासंदर्भात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. यासंदर्भात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांनी दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: