Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द

नागपूर – अमरावती लोकसभा मतदारसंघातील खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने रद्द ठरवले आहे. न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त खंडपिठाने निकाल देत खासदार नवनीत राणा यांना २ लाखांचा दंडही या संपुर्ण प्रकरणात ठोठावला आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान जात प्रमाणपत्राला आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती.

नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन याचिका दाखल केल्या होत्या. त्यामध्ये पहिली याचिका ही जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राबाबतची होती. तर दुसरी याचिका ही लोकसभा निवडणूकीदरम्यान केलेल्या जात प्रमाणपत्राबाबतची होती. यामधील २०१७ च्या याचिकेवर निकाल देताना खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र कोर्टाने अवैध ठरवले आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही तयारी आनंदराव अडसूळ यांनी दाखवली आहे. नवनीत राणा यांनी खोटे प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी येत्या दिवसात फौजदारी गुन्हा दाखल करत त्यांना तुरूंगात पाठवणार असल्याचेही आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले.

शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतसंघातून निवडणूकीत निवडून आल्या होत्या. त्याठिकाणी दुसऱ्या क्रमांकवरच आनंदराव अडसूळ यांना समाधान मानावे लागले होते. परंतु न्यायालयाच्या जात प्रमाणपत्राच्या निकालामुळे याठिकाणी नवनीत राणा यांची खासदारकी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. खासदारकी रद्द झाली तर दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला थेट खासदारकी मिळणार की पुन्हा निवडणूक लागणार हे मात्र येत्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पंजाबी आणि साऊथच्या चित्रपटांमध्ये याआधी काम केले आहे. त्यांनी २०११ मध्ये अमरावतीचे आमदार रवी राणा यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतरच अनुसुचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. मुंबईतल्या आजोबांचेही प्रमाणपत्र हे बनावटरीत्या तयार करण्यात आल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading